58,000 परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत.

कर्नाटक ठरले पहिल्या पसंतीचे राज्य : नेपाळमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक

नेपाळ अद्यापही भारतात सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पाठविणारा देश आहे. तर विदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक सर्वात आघाडीवर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. उच्चशिक्षणावर अखिल भारतीय सर्वेक्षण (एआयएसएचई) 2023-24 मध्ये भारताच्या उच्च शिक्षणसंस्थांमध्ये 173 देशांमधून विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचे नमूद आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये एकूण 58,134 विदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एआयएसएचई देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून ऑनलाइन माध्यमातून विस्तृत माहिती प्राप्त करते. याकरता संस्था विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची माहिती, सुविधा, परीक्षा निकाल आणि अन्य माहिती एआयएसएचई पोर्टलवर अपलोड करतात. हे सर्वेक्षण भारतात उच्च शिक्षणाशी निगडित अधिकृत आकडेवारीचा मुख्य स्रोत आहे. यामुळे शिक्षण धोरण तयार करणे, योजना तयार करणे आणि शिक्षण क्षेत्राच्या देखरेखीत मदत मिळते.

कुठल्या देशातून आले विद्यार्थी?

2023-24 मध्ये भारतात येणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक हिस्सेदारी नेपाळची राहिली. नेपाळमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण विदेशी विद्यार्थ्यांच्या 24.1 टक्के राहिली. यानंतर संयुक्त अरब अमिरातमधून 7 टक्के, अमेरिकेतून 5.9 टक्के, बांगलादेशातून 5.9 टक्के, नायजेरियामधून 5.5 टक्के आणि झिम्बाम्बेमधून 4 टक्के विद्यार्थी भारतात आले.

अभ्यासक्रमाची निवड

अहवालानुसार सर्वाधिक विदेशी विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. एकूण विदेशी विद्यार्थ्यांमध्ये 73.6 टक्के विद्यार्थी पदवी स्तराचे शिक्षण घेत होते. यानंतर 16.8 टक्के विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला होता. एकूण 42,779 विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांमध्ये शिकत होते, हे प्रमाण एकूण विदेशी विद्यार्थ्यांच्या सुमारे 74 टक्के आहे. यात 27,849 पुरुष आणि 14,930 महिला होत्या. याचबरोबर 9,845 विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकत होते. तर डिप्लोमा, पीएचडी, प्रमाणपत्र आणि अन्य संयुक्त अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षा कमी राहिली आहे.

कुठल्या राज्यांना पसंती?

?आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास कर्नाटक सर्वात आघाडीवर राहिले.

?कर्नाटकातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये 7,914 विदेशी विद्यार्थी शिकत आहेत.

?पंजाब दुसऱ्या स्थानावर राहिले, तेथे 7,902 विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश.

?महाराष्ट्रात 6,190 तर उत्तरप्रदेशात 5,933 अन् तामिळनाडूत 5,964 विदेशी विद्यार्थी.

?ही राज्यं विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये सामील आहेत.

 

संख्या किती वाढली?

?भारतात विदेशी विद्यार्थ्यांची संख्या 2019-20 मध्ये 48,989 होती, जी वाढून 2023-24 मध्ये 58,134 झाली आहे.

?5 वर्षांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत 9,236 ने वाढ झाली,  म्हणजेच यात 18.9 टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

?विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येतील वाढमध्ये पुरुष अन महिला दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

? विद्यार्थ्यांची संख्या 32,386 वरून वाढत 37,295 झाली, तर विद्यार्थिनींची संख्या 16,512 वरून वाढत 20,839 झाली.

? 2023-24 मध्ये लेबनॉन, बुर्किना फासो, मंगोलिया, मेक्सिको, कजाकस्तान, बेलारुस, चिली समवेत अनेक अन्य देशांचे विद्यार्थी आले.

Comments are closed.