अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे
इराणचा मध्य-पूर्वेकडील सहा देशांवर हल्ला : अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर : महायुद्धाचे सावट
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन, तेहरान
अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. इराणच्या नौदलाने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी तळांवर मोठा हल्ला चढवला. इराणनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले करून परिस्थिती आणखी चिघळवली आहे. दरम्यान, काही वृत्तांनुसार अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात आणखी एक इराणी सैनिक ठार झाला आहे. दोन्ही देशांनी तूर्तास तरी जीवितहानीचा कोणताही आकडा जाहीर केलेला नसला तरी हवाई हल्ले सुरू असल्याने आस्थापना आणि सुरक्षा केंद्रांचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे.
अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणने मध्य-पूर्वेत प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. रविवारी, इराणने जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या सहा देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि सामरिक प्रतिष्ठानांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. यापूर्वी, अमेरिकेने इराणमधील सुमारे 140 लष्करी तळांवर बॉम्बहल्ला केला होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर हे बॉम्बहल्ले झाले. जहाजाला आग लागल्याने इंजिनचे नुकसान झाले असून एक कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर इराणने जॉर्डनमधील प्रिन्स हसन हवाई तळ, कुवेतमधील अमेरिकेची पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार केंद्र, बहरीनमधील अमेरिकेचे लष्करी दळणवळण केंद्र यांवर क्षेपणास्त्रs आणि ड्रोन डागले. तसेच कतार आणि संयुक्त अरब अमिरातीलाही लक्ष्य केले. इराणने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करतानाच संभाव्य प्रत्युत्तराचा इशाराही दिला आहे.
इराणचा ओमानवरही ड्रोनहल्ला
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानवरही परिणाम झाला आहे. ओमान सरकारने देशाच्या मुसांदम प्रांतात ड्रोन हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे. ओमान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून देश आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे म्हटले आहे. तथापि, कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी, इराणच्या आयआरजीसीने ओमानमधील दुक्म बंदरातील अमेरिकी विमानवाहू जहाजांच्या लॉजिस्टिक्स सपोर्ट सेंटर आणि इंधन पुरवठा तळांवर मोठा हल्ला केल्याचा दावा केला होता.
जॉर्डनवर डागली तीन क्षेपणास्त्रs
इराणने रविवारी पहाटे जॉर्डनवर तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs डागली. तिन्ही क्षेपणास्त्रs वेगवेगळ्या ठिकाणी पडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे नुकसान झाले. यापूर्वी, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने जॉर्डनच्या प्रिन्स हसन एअरबेसवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला होता. या हल्ल्यात एअरबेसचे कमांड आणि कंट्रोल सेंटर तसेच एमक्यू-9 ड्रोन ठेवलेले हँगर नष्ट झाल्याचे दिसून आले आहे.
इराणच्या हल्ल्यात नागरिकही लक्ष्य : बहरीन
इराण सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत असल्याचा आरोप बहरीनच्या लष्कराने केला आहे. हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले हाणून पाडल्याचे बहरीनच्या लष्कराने म्हटले आहे. देशातील सर्व लष्करी तुकड्या पूर्णपणे सतर्क असून देशाचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच सज्ज आहेत, असे बहरीनने एका निवेदनात म्हटले आहे. मात्र, बहरीनने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतानाच इराणची ही कृती आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊ : मोजतबा खामेनी
इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी अली खामेनी यांच्या निधनानंतर आपले पहिले निवेदन जारी केले. आपल्या वडिलांच्या आणि युद्धात मारल्या गेलेल्यांच्या रक्ताचा बदला घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही अमेरिका स्वत:च सामंजस्य कराराचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंनी कराराचे पालन केले तरच तो यशस्वी होईल, असेही त्यांनी सांगितले.
होर्मुझची सामुद्रधुनी ही आमची सामरिक ताकद: इराण
होर्मुझची सामुद्रधुनी इराणसाठी एक सामरिक प्रतिबंधक आणि मुख्य ताकद असल्याचे इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार मोहसेन रझाई यांनी सांगितले. देश आपल्या संरक्षण क्षमता व राष्ट्रीय सामर्थ्याच्या जोरावर आपले हितसंबंध आणि सुरक्षेचे रक्षण करेल, असा दावा त्यांनी केला. जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के पुरवठा या सामुद्रधुनीतून जात असल्यामुळे तेथील नाकेबंदीचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होतो. कतारसह आखाती देशांमधून येणारा सुमारे 20 टक्के एलएनजी (नैसर्गिक वायू) देखील याच मार्गाने जगभर पोहोचतो.
कुवेतने केला इराणच्या हल्ल्यांचा निषेध
कुवेतने आपल्या भूभागावरील इराणच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून या हल्ल्यांना ‘तणाव वाढवणारे अत्यंत धोकादायक कृत्य’ असे म्हटले आहे. अशा हल्ल्यांमुळे प्रदेशात अस्थिरता वाढेल, शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल आणि राजनैतिक प्रयत्नांना बाधा येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आपली सुरक्षा आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेनुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आम्ही राखून आहोत. सध्याची परिस्थिती संपूर्ण आखाती प्रदेशासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे, असे कुवेतचे म्हणणे आहे.
इराणच्या चार प्रांतांमध्ये अमेरिकेचे हल्ले
इराणी सूत्रांनुसार, अमेरिकेने किमान चार प्रांतांमधील लष्करी आणि व्यावसायिक ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले आहेत. बुशेहर, जास्क, सिरिक, बंदर अब्बास, कांगन, बंदर-ए-देर आणि असलुयेह यासह अनेक शहरांमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. बुशेहरवरील हल्ला महत्त्वपूर्ण मानला जातो कारण तेथे इराणचा एक अणुऊर्जा प्रकल्प आहे. जास्कमध्ये किमान 10 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. आग्नेय इराणमधील कोनारक आणि आसपासच्या परिसरातही स्फोट झाले आहेत. जास्क आणि सिरिकसारखी शहरे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जातात. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेच्या हल्ल्यांची व्याप्ती वाढत असल्याचे दिसत आहे. हल्ले सुरूच राहिले, तर अमेरिकेला आणखी तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पुन्हा एकदा इराणने दिला आहे.
Comments are closed.