क्षेपणास्त्र उत्पादन खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याची तयारी

अस्त्र मार्क-2 संबंधी घेतला जाणार निर्णय : मागविण्यात येणार प्रस्ताव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संरक्षण उद्योगक्षेत्रात भारत सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अलिकडेच इंडोनेशियासोबत झालेल्या अस्त्र क्षेपणास्त्राच्या (आकाशातून आकाशात मारा करणारे) करारानंतर सरकार याचे उत्पादन वाढविण्याचा विचार करत आहे. सरकारने क्षेपणास्त्र निर्मितीक्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्याची तयारी चालविली आहे. आतापर्यंत भारतीय क्षेपणास्त्र उद्योग मुख्यत्वे सरकारी कंपन्यांच्या हातातच राहिला होता, परंतु सरकार आता हे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करू इच्छित आहे.

सरकारचे हे पाऊल महत्त्वाकांक्षी शस्त्रास्त्र निर्यात धोरणाचा एक भाग आहे. इंडोनेशियासोबत झालेल्या अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्राच्या करारानंतर सरकार याचे उत्पादन वाढविण्यावर जोर देत आहे. वर्तमानात याची निर्मिती केवळ ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’कडून केली जात आहे, बीडीएलकडून भारतीय सैन्याची मागणीच पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. डीआरडीओकडून विकसित क्षेपणास्त्रांचा पुरवठा वाढविला जावा, याकरता याची उत्पादनक्षमता वाढविली जावी अशी सरकारची इच्छा आहे.

अनेक कंपन्यांचा सहभाग

इंडोनेशियासोबत अन्य देश देखील या क्षेपणास्त्राच्या खरेदीकरता उत्सुकता दाखवत आहेत. अशास्थितीत सरकार याची मागणी आणि पुरवठ्यात कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही. या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला पुढे नेण्यासाठी लवकरच अस्त्र मार्क-2 बियॉन्ड व्हिज्युअल रेंजला (बीव्हीआर) खासगी कंपन्यांच्या हाती सोपविण्याचा विचार सरकार करत आहे. सरकार लवकरच खासगी कंपन्या म्हणजेच आयसीओएमएम, अदानी समूह, भारत फोर्ज, टाटा समूह आणि महिंद्रा यासारख्या मोठ्या उद्योगसमुहांना याकरता आमंत्रित करू शकते.

भारताचे अस्त्र मार्क-2 क्षेपणास्त्र

ऑपरेशन सिंदूरमध्ये अस्त्र मार्क-2 क्षेपणास्त्राने मोठी भूमिका बजावली होती. आकाशातून आकाशात मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला सुमारे 180-200 किलोमीटरपर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राला तेजस मार्क-1ए, मिग-29, सुखोई-30एमकेआय आणि राफेल विमानांसोबत जोडले जाऊ शकते. भारत सरकार स्वत:च्या शस्त्रास्त्र गुंतवणुकीच्या लक्ष्यासाठी अस्त्र मार्क-2 क्षेपणास्त्र तयार करत आहे.

‘प्रलय’बाबतही निर्णय

अस्त्र मार्क-2 क्षेपणास्त्राच्या यशस्वी संचालनानंतर सरकार प्रलय क्षेपणास्त्राची निर्मितीही खासगी हातांमध्ये सोपविण्याचा विचार करत आहे. पुरवठ्यात वाढ करण्यासाठी सरकार लवकरात लवकर याकरता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याची शक्यता आहे. प्रलय क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 500 किलोमीटरपर्यंत आहे. हे ध्वनिच्या वेगाच्या सुमारे 6 पट अधिक वेगाने झेपावू शकते. हे क्षेपणास्त्र भारताच्या ‘इंटीग्रेटेड रॉकेट फोर्सेस’चा हिस्सा आहे. यात अलिकडेच विकसित लाँग रेंज लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्र, पुढील पिढीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि पिनाका मल्टी बॅटरी सिस्टीमला सामील करण्यात आले आहे.

खासगी कंपन्यांची भागीदारी

-भारताने विमान, ड्रोन, तोफा आणि अन्य संरक्षण उत्पादनांना खासगी क्षेत्रासाठी खुले केले आहे.

-आतापर्यंत क्षेपणास्त्र उत्पादनावरून निर्णय घेण्यात आला नव्हता, परंतु आता यादिशेने पावले उचलली जातील.

-भारतीय क्षेपणास्त्रांची मागणी अन् पुरवठ्यात संतुलन राखण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

 

Comments are closed.