दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी रणवीर सिंग घेणार पॅटरनिटी ब्रेक, आॅगस्टपासून करणार नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात
अभिनेता रणवीर सिंग लवकरच आपल्या आगामी ‘प्रलय’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. परंतु त्यानंतर दुसऱ्या बाळाच्या आगमना निमित्त तो काही काळासाठी ‘पॅटरनिटी ब्रेक’ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, रणवीर ऑगस्ट 2026 पासून दिग्दर्शक जय मेहता यांच्या ‘प्रलय’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. हे शूटिंग दिवाळीपर्यंत चालणार असून, त्यानंतर नोव्हेंबरच्या सुमारास तो कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कामातून विश्रांती घेईल. चित्रपटाचे दुसरे वेळापत्रक 2027 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
‘प्रलय’ हा झोंबी थ्रिलर प्रकारातील चित्रपट असून, रणवीर सिंग पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत किंवा इतर कलाकारांविषयी अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकल्पाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे प्रामुख्याने शूटींग हे ऑस्ट्रेलियामध्ये चित्रित केले जाणार आहे. चित्रपटाचा विषय आणि व्याप्ती लक्षात घेता रणवीरने त्यासाठी विशेष शारीरिक आणि मानसिक तयारी सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
दरम्यान, रणवीर आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करत आहेत. 2018 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याला सप्टेंबर 2024 मध्ये ‘दुआ’ नावाची कन्या झाली होती. एप्रिल 2026 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती.
सध्या दीपिका गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात असून, या महत्त्वाच्या काळात कुटुंबासोबत राहण्यासाठी रणवीरने चित्रपटाच्या कामातून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे व्यावसायिक आयुष्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारीलाही प्राधान्य देण्याचा रणवीरचा निर्णय चाहत्यांकडूनही कौतुकास्पद मानला जात आहे.
Comments are closed.