रिलेशनशिपमध्ये ‘ब्रेडक्रंबिंग’ची ही 4 लक्षणं ओळखा नाही तर…
बदलत्या काळानुसार नात्यांची व्याख्याच पूर्ण बदलली आहे. चॅट, सोशल मीडिया आणि सततच्या ऑनलाइन संपर्कामुळे अनेक नवीन रिलेशनशिप ट्रेंड समोर येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘ब्रेडक्रंबिंग’ (Breadcrumbing). या प्रकारात एखादी व्यक्ती समोरच्याला पूर्णपणे स्वीकारतही नाही आणि नातं संपवतही नाही. अधूनमधून प्रेमळ मेसेज, थोडं लक्ष किंवा खोटी आशा देत ती व्यक्ती समोरच्याला नात्यात अडकवून ठेवते. त्यामुळे अशा वागणुकीची वेळेत ओळख होणं गरजेचं आहे.
‘ब्रेडक्रंबिंग’ म्हणजे नेमकं काय?
‘ब्रेडक्रंबिंग’ हा शब्द ब्रेडचे छोटे तुकडे (Breadcrumbs) या संकल्पनेवरून आला आहे. जसं पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी जमिनीवर ब्रेडचे छोटे तुकडे टाकले जातात, तसंच रिलेशनशिपमध्ये काही लोक समोरच्या व्यक्तीला पूर्ण प्रेम, वेळ किंवा कमिटमेंट देत नाहीत. मात्र अधूनमधून मेसेज, कॉल किंवा गोड बोलून त्या व्यक्तीच्या मनात आशा जिवंत ठेवतात. अशा वागणुकीला ब्रेडक्रंबिंग म्हंटलं जातं.
‘ब्रेडक्रंबिंगची लक्षणं:
1) अचानक गायब होणे
काही दिवस किंवा आठवडे कोणताही संपर्क न ठेवता अचानक रोमँटिक मेसेज किंवा कॉल करणं, ही ब्रेडक्रंबिंगची सामान्य खूण असू शकते.
2) ऑनलाइन प्रेम, पण प्रत्यक्ष…
चॅटमध्ये खूप प्रेमळ बोलणं, पण भेटायचं म्हटलं की सतत कारणं सांगणं किंवा योजना पुढे ढकलणं, हेही एक महत्त्वाचं लक्षण आहे.
3) भविष्याबद्दल अनिश्चितता
रिलेशनशिपबद्दल, कमिटमेंटबद्दल किंवा भविष्यातील योजनांबद्दल विचारलं की विषय बदलणं किंवा “अजून वेळ आहे”, “मी तयार नाही” अशी उत्तरं देणं.
4) सोयीनुसार संपर्क
त्यांना गरज असेल, कंटाळा आला असेल किंवा वेळ असेल तेव्हाच मेसेज किंवा कॉल करणं. मात्र तुमच्या मेसेजला उत्तर देण्यासाठी तास किंवा दिवस लावणं.
मानसिक आरोग्यावर परिणाम
ब्रेडक्रंबिंगमुळे अनेकांना सतत संभ्रम, असुरक्षितता आणि भावनिक थकवा जाणवू शकतो. “मी काही चूक केली का?”, “तो/ती खरंच माझ्यावर प्रेम करतो/करते का?” असे प्रश्न सतत मनात येऊ शकतात. याचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
ब्रेडक्रंबिंगमधून स्वतःला कसं बाहेर काढाल?
– आपल्या अपेक्षा आणि भावना स्पष्टपणे पार्टनरसमोर मांडा.
– सतत दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहू नका.
– कृती आणि शब्द यामधला फरक ओळखा.
– स्वतःच्या स्वाभिमानाला प्राधान्य द्या.
– जर समोरची व्यक्ती नात्याबद्दल स्पष्ट नसेल, तर पुढे जाण्याचा विचार करा.
Comments are closed.