राम मंदिर लुटीविरोधात शनिवारी नागपुरात रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी शिवसेनेने राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाचा दुसरा टप्पा उपराजधानी नागपुरातून 18 जुलैपासून सुरू होणार आहे. नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज तयारीचा आढावा घेतला.
राम मंदिरात झालेल्या लुटीने करोडो रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राम मंदिर लुटणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी आणि हिंदू जागृतीसाठी शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. मुंबईत दादर येथील हनुमान मंदिरासमोर या आंदोलनाचा शंखनाद झाला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपुरात आंदोलन होणार आहे.
18 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता रामरक्षा आंदोलन होणार आहे. यावेळी रामभक्तांची मोठी गर्दी उसळणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत नागपुरात आले असून त्यांनी आज रामनगर येथे राम मंदिराला भेट दिली व पाहणी केली. देवस्थानचे प्रमुख रवी वाघमारे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. उद्या अन्य काही ठिकाणीही पाहणी करणार, असे त्यांनी सांगितले.
ज्यांना रामरक्षा तोंडपाठ आहे तेच चोर निघाले
दोन पाने रामरक्षा वाचून दाखवणार असाल तर मीदेखील रामरक्षा म्हणायला तुमच्यासोबत येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ज्यांना रामरक्षा तोंडपाठ आहे, उत्तम प्रकारे म्हणता येते तेच राम मंदिराच्या दानपेटीचे चोर निघाले. त्यामुळे फडणवीसांनी सल्ले देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी, त्यातले काही चोर महाराष्ट्रातील आहेत, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.
Comments are closed.