Beed News – अंबाजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयातून एकाच दिवशी सात डॉक्टरांच्या बदल्या; गोरगरिबांचे रूग्णालय मनुष्यबळाविना सलाईनवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आशिया खंडातील पहिले ग्रामीण रूग्णालय म्हणून ओळख असणार्‍या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. गोरगरिबांचे रूग्णालय म्हणून ख्याती असलेल्या या रुग्णालयामध्ये एकीकडे सिमेंटची जंगले वाढत आहेत. रुग्णालयाचे मजले वाढत आहेत. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीही उपलब्ध होत असताना यंत्र चालवण्यासाठी हात उपलब्ध नाहीत. सर्वच विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असताना काल एकाच दिवशी सात डॉक्टरांच्या बदल्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रोज चार हजार रुग्णांची ओपीडी असणारे हे रुग्णालय डॉक्टरांविना ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अंबाजोईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय ग्रामीण भागातील गोरगरिब रूग्णांसाठी वरदान ठरलेले आहे. आठवड्यामध्ये दहा ते पंधरा हजार रूग्णांची ओपीडी असणारे आशिया खंडातील हे पहिले ग्रामीण रूग्णालय आहे. एकीकडे सरकार कंत्राटदारांना पोसण्यासाठी रूग्णालयाचा भूगोल वाढवत आहेत. मजल्यावर मजले चढवले जात आहेत. ग्रामीण रूग्णालयामध्ये सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. इमारतींचा आवाका जसा वाढला तसाच इमारतीमध्ये आधुनिक उपचार सुविधाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या. यंत्र सामुग्रीने सज्ज असलेल्या या ग्रामीण रूग्णालयाची अवस्था आता हळूहळू बिकट होत चालली आहे. आरोग्य खात्याचे या रूग्णालयाकडे साफ दुर्लक्ष होत आहे. या रूग्णालयातून बदली झालेल्या जागेवर नविन नियुक्त्या होणे बंद झाले आहे. सर्वच विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. त्यातच काल रात्री एकाच दिवशी डॉ.राकेश जाधव, डॉ.नागेश अब्दागिरे, डॉ.अमोल कापसे, डॉ.भाऊसाहेब मुंडे, डॉ.राहुल हाके पाटील, डॉ.दीपाली कुलकर्णीसह अन्य एका डॉक्टरांची बदली करणयत आली आहे.

डॉक्टरच उपलब्ध नसल्याने ग्रामीण रूग्णालय ओस पडत चालले आहे. डॉक्टरांच्या अचानक झालेल्या या बदल्यांमुळे अंबाजोगाईमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य खात्याच्या कुचकामी धोरणांचा फटका अंबाजोगाईच्या या ग्रामीण रूग्णालयाला बसत आहे.

शिवसेना रस्त्यावर उतरणार
एकाच दिवशी सात डॉक्टरांच्या बदल्या झाल्यानंतर अंबाजोगाईत मोठी खळबळ उडाली आहे. खाजगी रूग्णालयामध्ये आरोग्य उपचार परवडत नसल्याने सामान्य रूग्णांना या रूग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. पण मनुष्यबळ कमी होत चालल्याने ग्रामीण रूग्णालय सलाईनवर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ग्रामीण रूग्णालयाच्या अधिष्ठाताला निवेदन दिले. बदली करण्यात आलेल्या सात डॉक्टरांना कार्यमुक्त केले तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शहरप्रमुख अशोक हेडे, माजी तालुकाप्रमुख मदन परदेशी, बाळासाहेब वाघळकर, सुखदेव धोतरे, शंकर भीसे, सुधाकर शिंदे, रमेश टेकाळे, आदी उपस्थित होते.

Comments are closed.