Beed News – अखेर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसला; कोठे सरी, तर कोठे दमदार पुनरागमन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तर केज, धारूर, अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आकाश ढगाळून आले आणि वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून सुकण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.

बीड जिल्ह्यात बुधवारी दुपारी 15 दिवसानंतर पावसाचे आगमन झाले. केज शहरासह तालुक्याच्या भागामध्ये तब्बल एक तास दमदार पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ, वरपगाव, राडी, सातेफळ आणि कानडी परिसरात दुपारी वार्‍यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. अंबाजोगाई तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील अजून काही भागात हलक्या व मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक तालुक्यांमध्ये अद्याप पेरणीयोग्य किंवा पिकांना जीवदान देईल असा मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उर्वरित भागातील बळीराजा अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

केजमध्ये सरी बरसल्या, पिकांना जीवदान
खरीप हंगाम धोक्यात आला होता. पेरणी होवून काही दिवसांचा कालावधी उलटून गेला. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असताना पावसाने केज तालुक्याला झोडपून काढले. तब्बल दोन तास जोरदार पाऊस झाला. केज परिसरामध्ये या झालेल्या पावसामुळे रानातून पाणी निघाले आहे. ताली भरल्या आहेत. पिकांना जीवदान मिळाले आहे. चिंताग्रस्त शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसू लागले.

माजलगावमध्ये समाधानकारक सरी
सायंकाळच्या सुमारास माजलगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. माजलगाव तालुक्यातील ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे. दुबार पेरणीचे संकट आता टळले आहे.

Comments are closed.