उंबरणेवाडी गावकऱ्यांचा पोटासाठी रोजच कडेकपाऱ्यांत शिडीवरून जीवघेणा प्रवास, ना रस्ता, ना वीज, ना आरोग्य सुविधा.. सांगा जगायचं कसं?

>> समाधान दिसले

मंत्रालयात बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्राचा विकास झाला. पण मुंबईच्या वेशीवर असलेल्या खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी, पीरकरवाडी व आरकसवाडी या तिन्ही वाड्यांमध्ये मात्र त्याचा पत्ताच नाही. उंबरणेवाडीतील गावकऱ्यांना तर पोटाची खळगी भरण्यासाठी रोज कडेकपाऱ्यात शिडीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या वाड्यांत ना रस्ता, ना वीज, ना आरोग्य सुविधा. फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्रामच्या आधुनिक काळातील या वाड्या आहेत की प्राचीन युगातील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मुख्यमंत्री विकास झाला असे म्हणत असले तरी आमचा ‘विकास’ मात्र हरवलाय, अशी आर्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

उंबरणेवाडी, पीरकरवाडी व आरकसवाडी या वाड्या लोधिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. अंदाजे साडेतीनशे एवढी येथील लोकसंख्या आहे. मुंबईपासून थोड्याच अंतरावर खालापूर असला तरी येथे कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. प्राथमिक सुविधांदेखील उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी ग्रामस्थांचे वर्षानुवर्षे हाल सुरू आहेत. ११ जुलै रोजी उंबरणेवाडीमधील मनीषा पारधी या गर्भवती महिलेला झोळीत टाकून प्रसूतीसाठी चौक येथील आरोग्य केंद्र गाठावे लागले. त्यासाठी दगडवाटा, काटेकुटे तुडवावे लागले. सुदैवाने तिची आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली. मात्र यानिमित्ताने डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींची बिकट अवस्था चव्हाट्यावर आली.

* उंबरणेवाडी, पीरकरवाडी, आरकसवाडी येथे जाण्यासाठी आदिवासींना डोंगरात लावलेल्या लोखंडी शिडीचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात तर पाय घसरून पडण्याची शक्यता असते. रस्ताच नसल्याने ही जीवघेणी कसरत करावी लागते.
* या वाड्यांकडे जाताना दोन ठिकाणे अशी आहेत की, डोंगरावरून कधीही दगड अंगावर कोसळून जीवावर बेतू शकते. अरुंद वाट असल्याने थेट दरीत कोसळण्याचीही भीती आहे.
* याच मार्गावरून तिन्ही वाड्यांमधील सुमारे ५० आदिवासी तरुण रोजीरोटी कमावण्यासाठी डोंगर चढून माथेरान गाठतात. त्यांचा जीवमुठीत घेऊन वर्षानुवर्षे प्रवास सुरू असून सरकारने त्याकडे ढुंकूनही लक्ष दिलेले नाही.

बालदी… तुझे वचन काय होते?

या भागातील भाजपचे स्थानिक आमदार महेश बालदी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गावात आले होते. त्यावेळी त्यांनी मी तुम्हाला लाईट, रस्ता, पाणी देईन असे देवीची शपथ घेऊन आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात त्यातील एकही बाब पूर्ण केली नसल्याचे सांगण्यात आले. बालदी… क्या हुआ तेरा वादा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

शिक्षणाची व्यवस्था फक्त चौथीपर्यंत

उंबरणेवाडी, पीरकरवाडी व आरकसवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेची फक्त एकच शाळा आहे. तीही चौथीपर्यंत. पाचवीपासून मात्र मुलांनादेखील कडेकपाऱ्या तुडवत स्वतःचा जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागते. त्यामुळे शिक्षणाच्या नावानेही बोंब असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात विकासाच्या गप्पा मारतात, पण खरा विकास कुठे झालाय महाराष्ट्राचा? एका बाजूला तुम्ही मिसिंग लिंक काढली, कोट्यवधींचा खर्च तिथे केला, मग आदिवासींकडे का लक्ष देत नाही?
-बबन वीर, उंबरणेवाडी ग्रामस्थ

आम्ही सकाळी ६ वाजता घरातून निघतो. तेव्हा माथेरानला दोन ते अडीच तासांनी पोहोचतो, त्यानंतर मजुरी करतो. पण स्थानिक आमदार – ग्रामपंचायत आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. शहरात लाईट नसेल तर तुमचा जीव कासावीस होतो. मग एवढ्या जंगलात आम्ही अंधारात कसे राहात असू याचा विचार करा.
-प्रदीप उघडा, ग्रामस्थ

रोजगारासाठी माथेरानला दोन तास पायी प्रवास करत रोजीरोटीसाठी कामाला जातो. सरकारने आमच्याकडे सप्रशेल दुर्लक्ष केले आहे. लाईट नाही – पाणी नाही. महिलांसाठी शौचालयदेखील नाही. ग्रामीण भागातील महिला तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत काय?
-योगेश पारधी, ग्रामस्थ

Comments are closed.