असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकार विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज; वांगचुक यांच्या उपोषणावरून आदित्य ठाकरे यांचे आवाहन
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लडाखचे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. आज या बेमुदत उपोषणाचा 19 वा दिवस असून वांगुचक यांची प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. मात्र, सरकार या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करतना दिसत आहे. यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. भाजप सरकारची ही असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याप्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची अत्यंत साधी आणि रास्त मागणी आहे. पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना तातडीने पदावरून हटवले पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारानंतरही इतके अकार्यक्षम केंद्रीय मंत्री कोणत्याही देशात पदावर राहिले नसते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दिल्ली मध्ये @वांगचुक66 जी ज्या कारणासाठी उपोषण करत आहेत, त्या प्रश्नाविषयी भाजप सरकारची असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही.
त्यांची अत्यंत साधी मागणी आहे, पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांना…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 16 जुलै 2026
‘लोकांमध्ये फूट पाडा आणि सत्ता टिकवा’ हेच भाजपचे धोरण
सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराविरोधात आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षांसह नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पेपरफुटी असो, इथेनॉलचा प्रश्न असो किंवा मंदिरांचा मुद्दा… भाजपचे एकच धोरण राहिले आहे, ते म्हणजे लोकांमध्ये फूट पाडायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Comments are closed.