‘प्रथमदर्शनी घातपात नाही, पण…’; लातूरमधील डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून महत्त्व

लातूर क्राईम न्यूज: लातूर शहरातील एम.जे. हॉस्पिटलचे (M.J. Hospital) नामांकित हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी कारमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेल्या डॉ. मेहुल यांचा मृत्यू झाला होता. या हायप्रोफाईल प्रकरणावर आता लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. “प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नसून, हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे,” असा खुलासा त्यांनी केला आहे.

Latur Crime News: डीवायएसपी समीरसिंह साळवे काय म्हणाले?

या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी स्वतःला भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन घेऊन आपले जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.”

त्यांनी पुढे माहिती दिली की, “घटनास्थळावरून किंवा कारमधून कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता डॉक्टरांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्यामधील डेटा तपासला जात आहे. काही ठोस पुरावे हाती लागल्यानंतरच या टोकाच्या पावलामागचे मूळ कारण स्पष्ट होईल.” या प्रकरणी लातूर एमआयटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Latur Crime News: 11 वाजता घर सोडलं अन् मोबाईल लोकेशनने केला खुलासा

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी डॉ. मेहुल राठोड यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रियांका या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर लगेचच डॉ. मेहुल हे आपली इनोव्हा कार घेऊन घराबाहेर पडले. सायंकाळी चार वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने आणि फोनवर कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे डॉ. प्रियांका यांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले. तेव्हा त्यांचे लोकेशन घरापासून ८ किलोमीटर दूर अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ दाखवले.

Latur Crime News: कारच्या सीटवर आढळल्या भूल देण्याच्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या

लोकेशन मिळताच डॉ. प्रियांका यांनी तात्काळ तिथं धाव घेतली, तेव्हा डॉ. मेहुल हे कारमध्ये अत्यंत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने फुलाबाई बनसोडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

कारची तपासणी केली असता, पोलिसांना चालकाच्या बाजूच्या सीटवर भूल देण्याच्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्या आहेत. त्यामुळे औषधाचा ओव्हरडोस घेऊनच हा आत्महत्येचा प्रकार घडल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Comments are closed.