स्टीफन फ्लेमिंगनंतर चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? रवीचंद्रन अश्विनने सुचवलं चाहत्यांच्या मनातलं नाव
IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांच्या यांदीत स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाचा समावेश केला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी त्यांनी अगदी चोख पार पाडली आणि 17 वर्ष संघासोबत ते कायम राहिले. मात्र, काही दिवसांपूर्वी स्टीफन फ्लेमिंग आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी आपसी संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फ्रेंचाईजी आता नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. याच पार्श्वभुमीवर रवीचंद्रन अश्विनने एक नाव सुचवलं आहे.
दरम्यान, स्टीफन फ्लेमिंग आणि चेन्नईच्या नात्याचा विचार करता फ्लेमिंग 2008 मध्ये खेळाडू म्हणून संघात आले होते आणि 2009 पासून त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने 5 आयपीएल आणि 2 चॅम्पियन्स लीग विजेतेपदांसह विक्रमी 12 वेळा प्लेऑफ आणि 10 वेळा फायनल गाठली आहे. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सीएसकेला नव्या युगाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे. ESPNcricinfo नुसार अश्विन म्हणाला की, फ्लेमिंग आणि महेंद्रसिंह धोनी यांची विचारसरणी एकमेकांशी तंतोतंत जुळत असल्याने त्यांची भागीदारी खूप यशस्वी ठरली. आता संघाने भविष्याचा विचार करून पुढे गेले पाहिजे. जर धोनी स्वतः मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असेल, तर चेन्नईसाठी त्याच्यापेक्षा चांगला आणि योग्य पर्याय दुसरा कोणताही असू शकत नाही.
तथापि, धोनीने ही जबाबदारी न घेतल्यास नव्या प्रशिक्षकासमोरील आव्हान सोपे नसेल, असेही अश्विनने नमूद केले. कारण धोनी आजही संघातील सर्वात प्रभावशाली चेहरा असून संघ निवडीसारख्या महत्त्वाच्या निर्णयात त्याची भूमिका मोठी असते. अशा परिस्थितीत चेन्नईला स्वतःच्या जीवावर धाडसी निर्णय घेणारा आणि त्याची जबाबदारी स्वीकारणारा सक्षम प्रशिक्षक शोधावा लागेल, असे मत अश्विनने व्यक्त केले आहे.
Comments are closed.