Japan Open Badminton 2026 – सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत दमदार खेळ करत चीनच्या जागतिक क्रमवारीतील पाचव्या मानांकित हान यूचा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यंदाच्या हंगामातील सिंधूची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने दुसऱ्या फेरीत हान यूचा ३५ मिनिटांत २१-१६, २१-१४ असा पराभव केला. या विजयामुळे हान यूविरुद्ध सिंधूची कारकिर्दीतील आघाडी ८-१ अशी अधिक भक्कम झाली. आता उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर जपानच्या माजी जगज्जेत्या नोजोमी ओकुहारा हिचे आव्हान असेल. अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या आन से-यंगने दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीतून माघार घेतल्याने ओकुहाराला वॉकओव्हर मिळाला.

दरम्यान, मिश्र दुहेरीत हिंदुस्थानच्या तनिषा क्रास्टो व ध्रुव कपिला या जोडीचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. चीनच्या अव्वल मानांकित फेंग यान झे आणि हुआंग डोंग पिंग या जोडीने त्यांचा २२-२०, २१-१७ असा पराभव केला.

Comments are closed.