FIFA World Cup 2026 – प्रयोग फसला नव्हे फसफसलाय
>> मंगेश वरवडेकर
जग कप म्हणजे फुटबॉलचं लग्न. या लग्नाने जगभरात धमाका केलाय. दर चार वर्षांनी हा मांडव उभा राहतो, झेंडे लागतात, बॅण्ड वाजतो आणि जगभरातून नवनवे वऱ्हाडी येतात. यंदा मात्र यजमानांनी लग्नपत्रिका जरा जास्तच छापल्या. आधी 32 संघ होते. त्या 48 केल्या. सामने 64 वरून थेट 104 वर नेले. म्हणजे आधी फक्त जवळचे नातेवाईक बोलवायचे, यंदा गाव, तालुका, जिल्हा, राज्य… ज्याचा पत्ता मिळाला त्याला निमंत्रण गेलं. यात 35 कोटी लोकसंख्येचा अमेरिका यजमानी म्हणून होताच, पण फिफांनी दीड लाखाच्या कुरासावलाही वर्ल्ड कपचं निमंत्रण धाडलं. त्यांनीही आपल्या खेळाने हादरवलं. हीच या खेळाची खरी जादू आहे.
32 वरून 48 संघ झाले तेव्हा अनेक फुटबॉल पंडितांनी कपाळावर आठया चढवल्या. वर्ल्ड कपची प्रतिष्ठा घसरेल, दर्जा कमी होईल, एकतर्फी सामने वाढतील, अशी भविष्यवाणी सुरू केली. काहींच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते, जणू पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक एस.टी. कॅण्टीनचा स्वयंपाक वाढला जाणार होता, पण फुटबॉल हा पंडितांच्या भविष्यावर नाही, तर चेंडूच्या लहरीवर चालतो.
स्पर्धा सुरू झाली आणि छोट्या संघांनी मोठय़ांच्या नावाचा धाक अक्षरशः धुऊन काढला. काबो व्हर्डेने जगाला स्वतःची ओळख करून दिली. नॉर्वेने ब्राझीलला विमानाचं तिकीट काढून दिलं. मोरोक्कोने पुन्हा एकदा सांगितलं की, आफ्रिका आता पाहुणी नाही, ती स्पर्धक आहे. इजिप्त हरला, पण त्यांच्या या लढाऊ खेळाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली.
अचानक वर्ल्ड कपला नवे चेहरे मिळाले, नवे झेंडे दिसले, नवे राष्ट्रगीत कानावर पडले. काही देशांची नावं तर समालोचकांनाही दोनदा उच्चारून पाहावी लागली, पण त्यातच तर खरी मजा होती. कारण वर्ल्ड कप हा फक्त गोलांचा नसतो, तो गोष्टींचाही असतो. प्रत्येक छोटा संघ स्वतःबरोबर एक नवी कहाणी घेऊन येतो.
मात्र नाण्याची दुसरी बाजूही होती.
104 सामने म्हणजे थोडं जास्तच झालं. वर्ल्ड कपचा थरार कधी कधी टीव्ही मालिकेसारखा वाटू लागला. सुरुवातीचे काही भाग पाहिल्यावर प्रेक्षक विचारू लागला, अरे, मुख्य कथा कधी सुरू होणार? पूर्वी प्रत्येक सामना फटाक्यांच्या माळेसारखा असायचा. आता काही सामने दिवाळीनंतर उरलेल्या फुलबाजासारखे वाटले. उजेड होता, पण आवाज नव्हता.
वर्ल्ड कप म्हणजे बिर्याणी. त्यात भात, मसाला आणि मांस यांचं प्रमाण बरोबर असलं पाहिजे. फक्त भात वाढत राहिला, तर पोट भरतं, पण जीभ नाराज होते. फिफाने यंदा भात नक्कीच जास्त वाढला. पण मसालाही कमी पडू दिला नाही. उपांत्यपूर्व फेरीपासून स्पर्धेने असा वेग पकडला की, सुरुवातीच्या सगळय़ा तक्रारी चाहत्यांनी विसरून टाकल्या. प्रत्येक सामना हृदयाची धडधड वाढवणारा ठरला.
या विस्ताराचा सर्वात मोठा फायदा वेगळाच झाला. फुटबॉलचा भूगोल बदलला. पूर्वी वर्ल्ड कप हा युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या श्रीमंत घराण्यांचा खासगी समारंभ वाटायचा. बाकी जग फक्त वऱहाडी. यंदा मात्र गरीब नातेवाईकालाही मांडवात बसायला खुर्ची मिळाली. स्टेजवर फोटो काढता आला. ट्रॉफी मिळाली नाही, पण जगाने त्याची दखल घेतली. कधी कधी टाळीही ट्रॉफीइतकीच महत्त्वाची असते. पण शेवटी सर्वांच्या मनात एकच प्रश्न राहिला. 48 संघ… 104 सामने… असंख्य गोल… हजारो मिनिटांचा फुटबॉल… आणि उपांत्य फेरीत कोण? पुन्हा अर्जेंटिना. पुन्हा स्पेन. पुन्हा फ्रान्स. पुन्हा इंग्लंड. आता जेतेपदाच्या लढतीत जगज्जेता अर्जेंटिना आणि माजी विजेता स्पेन.
तेच तेच संघ वर्ल्ड कपमध्ये पोहोचले. वर्ल्ड कपचं युरोप आणि लॅटिन रोमान्स पुन्हा एकदा फायनलमध्ये रंगणार आहे. म्हणजे पुन्हा जगज्जेतेच कप उंचावणार. याचा अर्थ प्रयोग फसला का? अजिबात नाही. कारण वर्ल्ड कपचा उद्देश फक्त विश्वविजेता शोधणं नसतो, फुटबॉलची स्वप्नं जगभर पेरणंही असतं. आज काबो व्हर्डे, जॉर्डन, हैती, कुरासाव किंवा बोस्नियातील एखादा मुलगा टीव्हीवर स्वतःचा झेंडा पाहून चेंडूला लाथ मारत असेल. त्या लाथेतूनच कदाचित उद्याचा विश्वविजेता जन्माला येईल.
वटवृक्ष एका रात्रीत उगवत नाही. आधी बी पेरावी लागते. माती, पाऊस, ऊन आणि वेळ लागतो. 48 संघांचा निर्णय म्हणजे फिफाने अधिक बिया पेरल्या आहेत. त्यातून किती वटवृक्ष उभे राहतील, हे काळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र यंदाही बदलली नाही.
वर्ल्ड कप लग्न मोठं झालं… एकदम ग्रॅण्ड. मांडवही भव्य झाला… वऱहाडी वाढले… पण नवरा तोच राहिला आणि म्हणूनच 48 संघांचा हा प्रयोग वर्तमानापेक्षा भविष्यावर लावलेली पैज आहे. आज त्याचं फळ पूर्ण दिसत नाही. पण कदाचित दहा-बारा वर्षांनी जेव्हा एखादा नवखा देश वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श करेल तेव्हा इतिहास लिहिला जाईल, या गोष्टीची सुरुवात 2026 मध्ये, 48 वऱहाडय़ांच्या त्या लग्नातून झाली होती. त्यामुळे वर्ल्ड कपचा 48 संघाचा प्रयोग फसला नाही तर फसफसलाय. ज्याच्या नुसत्या फेसाने अवघं जग बेधुंद झालंय. फुटबॉलची झिंग आता आणखी वाढणार.
Comments are closed.