ENGvsIND: भारतासाठी वनडे मालिका जिंकणे सोपे नाही! 22 वर्षांपासून लॉर्ड्सवर पहिल्या विजयाची प्रतीक्षा
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. टी 20 मालिकेतील पराभवानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने विजयी सुरूवात केली, मात्र तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील दुसरा सामना गमावला. त्यामुळे ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता मालिका निर्णायक सामना रविवारी (19 जुलै) लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. या मैदानावर विजय मिळवणे भारतीय संघासाठी सोपे नाही. तर जाणून घेऊ तेथिल टीम इंडियाची आकडेवारी.
गेल्या 22 वर्षांत लॉर्ड्सवर भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. तेथे त्यांनी गेल्या 22 वर्षांत एकही वनडे सामना जिंकलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ आता हा दुष्काळ संपवणार की पुन्हा एकदा इंग्लंड बाजी मारेल, हे पाहणे रोमांचक ठरेल.
भारताने पहिला वनडे विश्वचषक लॉर्ड्सवर जिंकला
लॉर्ड्स हे क्रिकेटमधील ऐतिहासिक मैदान आहे. तेथे सर्वाचाच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. भारतानेही याच मैदानावर आपला पहिला-वहिला वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. या विजयानंतर 2002 मध्ये आणखी एका भारतीय कर्णधाराने उल्लेखनीय कामगिरी केली होती.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने 2002 च्या नॅटवेस् मालिकेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला होता. हा विजय लॉर्ड्सवरच आला होता. भारताने तेव्हा 325 धावांचे लक्ष्य पार केले होते आणि त्या धमाकेदार विजयानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून जर्सी काढून जल्लोष केले होता. आजही भारतीय क्रिकेट रसिकांच्या आठवणीत तो सामना आणि गांगुलीचे सेलिब्रेशन आहे.
अशा दोन ऐतिहासिक विजयानंतर, 2004 पासून भारतीय संघाने या मैदानावर एकही विजय मिळवलेला नाही.
भारताचे लॉर्ड्सवर केवळ 4 वनडे सामने विजय
भारताने लॉर्ड्सवर पहिला वनडे सामना 1975 मध्ये खेळला होता. तेव्हापासून भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण नऊ वनडे सामने खेळले आहेत. भारताने यामधील चार सामने जिंकले, तर चार सामने गमावले. एक सामना बरोबरीत सुटला. त्या चार विजयामध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध तीन आणि 1983 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धचा एक विजय मिळवला. या मैदानावर भारताचा शेवटचा विजय 2004 मध्ये आला.
2004 पासून तीन सामने गमावले
या मैदानावर भारताने 2004 पासून तीन सामने गमावले आहेत. येथे भारताने शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता, तो 100 धावांनी गमावला होता. तसेच 2011 मध्ये खेळला गेलेला सामना पावसामुळे थांबवला गेला आणि नंतर तो डकवर्थ-लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला.
त्यामुळे रविवारी होणारा सामना भारताला मालिका विजयाच्या आणि 22 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना जिंकावा, अशी चाहत्यांची आशा आहे.
Comments are closed.