अवतीभवती आणि त्रिवेणीच्या संगमावर श्री क्षेत्र वृद्धेश्वर
>> अभय मिरजकर
नवनाथ कथासार ग्रंथामध्ये उल्लेख असणारे जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र वृद्धेश्वर ज्याला म्हातारदेव असेही म्हणतात. आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याच्या त्रिवेणी संगमाचे हे जागृत ठिकाण आहे. अहिल्यानगर जिह्याच्या पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस गावाजवळ गर्भगिरीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. नाथ संप्रदायाचे आद्य शक्तिपीठ मानले जाणारे हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून निसर्गप्रेमींसाठीही एक आकर्षणाचे ठिकाण आहे.
वृद्धेश्वर मंदिराचा इतिहास नाथ पंथाच्या समृद्ध परंपरेशी जोडलेला आहे. पौराणिक कथेनुसार, गुरू मच्छिंद्रनाथांच्या इच्छेसाठी शिष्य गोरक्षनाथ यांनी या ठिकाणी त्रिभुवनास अन्नदान दिले. भव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता. या मंगलप्रसंगी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी नाथ पंथाचा मोठा मेळा जमवला होता. याच ठिकाणी गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना अनुग्रह दिला होता, ज्या वेळी त्रिभुवनातील सर्व देवता, ऋषीमुनी आणि संन्यासी एकत्र आले होते.
या स्थानाशी संबंधित आख्यायिका सांगितली जाते. गोरक्षनाथांनी आपल्या मंत्राचा वापर करून संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला होता. मात्र गुरू मच्छिंद्रनाथांनी तो सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण केला आणि वृद्धेश्वर येथे 33 कोटी देव, साधू-संत आणि ऋषीमुनींना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार येथे महाप्रसादाचा मोठा भंडारा झाला. असे मानले जाते की, स्वत भगवान महादेव आणि माता पार्वती यांनी ब्राह्मणाचे रूप धारण करून हा महाप्रसाद पंगतीत वाढला होता. जिथे देवांच्या रांगा जेवायला बसल्या होत्या, त्या स्थानाला आजही ‘देवराई’ म्हणून ओळखले जाते. जेव्हा सर्व देव जेवत होते, तेव्हा भगवान शिव एका ‘वृद्ध’ (म्हातारा) माणसाच्या रूपात त्या पंगतीत सामील झाले होते. नाथांनी आणि इतर देवांनी महादेवाला ओळखून त्यांना विनंती केली की, ‘हे महादेवा, तुम्ही याच रूपात विश्वकल्याणासाठी येथे वास्तव्यास राहावे.’ देवांच्या या प्रेमळ विनंतीला मान देऊन महादेव तिथे वृद्ध रूपात स्थिरावले, म्हणूनच या मंदिराला ‘वृद्धेश्वर’ किंवा स्थानिक भाषेत ‘म्हातारदेव’ असे नाव पडले आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर मनाला शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे आहे. कठीण डोंगररांगा, आजूबाजूची वनराई आणि नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी प्रत्येक भक्ताला एका वेगळ्याच अनुभूतीचा प्रत्यय आणून देते.
Comments are closed.