रुग्णालयातील स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावला, अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या डॉक्टरला तुरुंगवास
रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावल्याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या डॉक्टरला अमेरिकन न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने डॉक्टरला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्षांच्या प्रोबेशनची शिक्षा सुनावली आहे. अद्वैत देशमुख असे शिक्षा झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, 2025 मध्ये ओहायो येथील प्रोमेडिका टोलेडो हॉस्पिटलमधील युनिसेक्स स्वच्छतागृहात एका कर्मचाऱ्याला एक लपवलेला सेलफोन सापडला. कर्मचाऱ्याने तो सेलफोन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशमुखने ते आपले असल्याचा दावा करत त्याच्याकडून घेतला. टोलेडो पोलीस आणि प्रोमेडिका यांच्या संयुक्त तपासात त्या फोनमध्ये फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान काढलेली 80 हून अधिक छायाचित्रे आढळली. यानंतर देशमुखविरुद्ध खटला दाखल करण्यात आला.
तपासकर्त्यांनी सहा पीडितांची ओळखही पटवली. यापैकी कुणीही चित्रीकरणासाठी संमती दिली नव्हती. हा गुन्हा उघडकीस आला, तेव्हा देशमुख टोलेडो विद्यापीठात वैद्यकीय निवासी डॉक्टर म्हणून तिसऱ्या वर्षात शिकत होता. तो एंडोयुरोलॉजी आणि युरोलॉजिक ऑन्कोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करत होता. मात्र स्वच्छतागृहात सेलफोन सापडल्यानंतर टोलेडो विद्यापीठाने त्याला प्रशासकीय रजेवर पाठवले. अंतर्गत चौकशीनंतर त्याच्या निवासी नियुक्तीचे नूतनीकरण केले जाणार नाही असे सांगितले.
Comments are closed.