Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
दिल्ली जंतरमंतर येथे उद्धव ठाकरे “केंद्र सरकार ज्या बेरहमीने आणि असभ्यपणाने आंदोलक तरुण आणि महिलांवर अत्याचार करत आहे, हे कोणत्याही लोकशाहीचे लक्षण नाही. आज देशात जो आक्रोश दिसतोय, तो अचानक आलेला नाही; तर हा गेल्या १२ वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘जन की बात’ ऐकण्याऐवजी हुकूमशाही
आंदोलकांवर चालवलेल्या लाठीमाराचा आणि असभ्य वर्तनाचा निषेध करत उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या क्रूरतेने सरकार या तरुणांशी सुलूक करत आहे, ते पाहून आता लोक उघडपणे म्हणू लागले आहेत की यांच्यापेक्षा तर इंग्रज चांगले होते. जे सत्तेत बसले आहेत, त्यांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली आहे आणि ती हवा काढायला जनतेला वेळ लागत नाही.” स्वतःच्या ‘मन की बात’ लादणाऱ्या सरकारने लोकांची ‘जन की बात’ ऐकली पाहिजे, असा सल्ला देत त्यांनी भूतकाळातील दाखले दिले. “इंदिरा गांधींच्या काळात सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते, तेव्हा पंतप्रधान स्वतः त्यांना भेटायला गेल्या होत्या. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी मनमोहन सिंह सरकारने विलासराव देशमुखांना चर्चेसाठी पाठवले होते. लोकशाहीत चर्चा करणे हे सरकारचे कर्तव्य असते, पण हे सरकार चर्चा सोडून हुकूमशाही लादत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“महिलांवर अत्याचार, ही कोणती हिंदू संस्कृती?”
दिल्लीतील आंदोलनात 9-10 वर्षांच्या लहान मुलींवर आणि महिलांवर झालेल्या पोलिसांच्या बळाच्या वापरावर उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक झाले. “लहान मुलांवर आणि महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार केले गेले, काल एका तरुण मुलगीचे कपडे फाडले गेले, ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती असूच शकत नाही, ही निव्वळ ‘रावण संस्कृती’ आहे. जर आंदोलक मुले देशाचे भविष्य वाचवण्यासाठी राजीनामा मागत असतील, तर त्यात चुकीचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Comments are closed.