'रोहितला टीम इंडियातून वगळण्याची हिंमत कोणामध्ये आहे, बघतोच मी', दिग्गजाचे निवड समितीला आव्हान

जसा-जसा आयसीसी वनडे विश्वचषक 2027 जवळ येत आहे, तसे-तसे भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव येतो. असे का, कारण हे दोघे सध्या भारताकडून केवळ वनडे प्रकारचे सामने खेळतात आणि त्यांची एकातरी सामन्यात कामगिरी खालावली की त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना जोर येतो आणि मोठ्या प्रमाणात टीकाही होतात. नुकतेच त्याचा प्रत्यय रोहितच्या बाबतीत आला.

रोहित इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरला. यामुळे तो शेवटच्या सामन्यानंतर, म्हणजे लॉर्ड्स वनडेनंतर निवृत्ती घेणार या चर्चा सुरू झाल्या. त्या मालिका निर्णायक सामन्यात रोहितने विक्रमी शतकी खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे, मात्र आता दुसरी अडचण निर्माण झाली आहे.

रोहितने शतक झळकावले असले तरी त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. यावरून क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते यांच्यात मतभेद आहेत. काहींच्या मते त्याने 2027 च्या विश्वचषकापर्यंत राहावे, तर काहींच्या मते त्याची पुढे जाण्याची वेळ आली आहे.

2027 च्या विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जाणार आहे. त्यामुळे रोहितच्या फिटनेसचा मुद्दाही महत्त्वाचा असेल. सध्या तो 39 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याने त्याची फिटनेस टिकवून ठेवली आणि कामगिरी चांगली केली तर, त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नच उपस्थित केला जाऊ नये, असे भारतीय दिग्गजाने त्याच्या यू ट्युब चॅनलवर म्हटले आहे.

माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी रोहितने लॉर्ड्सवर शतक केल्यानंतर त्याला संघातून वगळण्याच्या प्रयत्नाबद्दल निवड समितीला आव्हान दिले. काही रिपोर्ट्सनुसार, निवड समितीने रोहितला कळवले होते की , तो आता संघाच्या योजनांचा भाग नाही आणि संघाला यशस्वी जायस्वालला संधी द्यायची आहे. नंतर हे वृत्त कर्णधार शुभमन गिल आणि बीसीसीआयने फेटाळून लावले.

यावरून मदन लाल यांनी म्हटले, “तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा फिटनेस हा महत्त्वाचा मुद्दा असतो. भविष्याचे नियोजन असले पाहिजे. रोहित त्या नियोजनात नव्हता, मात्र आता त्याने शतक केले आहे. तो खेळणार की नाही, हा निर्णय त्याने घ्यायचा आहे. लोक केवळ कोणाशीतरी मैत्री असल्यामुळे किंवा स्वत:च्या फायद्यासाठी अफवा पसरवतात.”

“जर तो उत्तम खेळत असेल, तर त्याला खेळू द्या. जर तो नियोजनात नसेल तर, निवड समितीने त्याला वगळले पाहिजे. कोणीतरी त्याला वगळण्याचा प्रयत्न करायला हवा. हे करण्याचे धाडस कोणामध्ये आहे, हे मलाही बघायला आवडेल,” असेही मदन लाल यांनी पुढे म्हटले आहे.

“एक दिवस निवृत्त व्हायचेच आहे. रोहित मात्र चांगला खेळत असेल आणि त्याला खेळायचं असेल तर तुम्ही शांत राहा. तुमच्यात हिंमत असेल, तर त्याला संघातून वगळा. तो चांगला कामगिरी करत असेल, तर ते तसेच सुरू राहु द्या. तुम्ही त्याच्याकडे जाऊन असे सांगू नका की ‘तू आमच्या योजनेचा भाग नाही’, कारण तो विचारेल ‘का? मी तर धावा करतोय.’,” असेही मदन लाल यांनी म्हटले आहे.

रोहितची वनडेतील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने आतापर्यंत 288 वनडे सामन्यांमध्ये 62 अर्धशतक आणि 34 शतकांच्या सहाय्याने 11895 धावा केल्या आहेत. तसेच तो 2020 पासून लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. (former Indian Madan Lal support Rohit Sharma and challenges selectors says if you have courage go ahead drop him from team India)

Comments are closed.