अफगाण संघाला मिळाला नवा कर्णधार; रहमत शाह जुरमती सांभाळणार वनडे आणि टेस्ट टीमची कमान
अफगाण क्रिकेट बोर्ड म्हणजेच ACB ने मोठी घोषणा केली आहे. रहमत शाह जुरमती यांची अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. हशमतुल्लाह शाहिदी यांनी 21 जुलैच्या संध्याकाळी राजीनामा दिल्यानंतर, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अनुभवी मध्यक्रमातील फलंदाज रहमत शाह जुरमती यांची अफगाणिस्तानच्या नव्या कसोटी (Test) आणि एकदिवसीय (ODI) संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ‘एक्स’ वर ही माहिती दिली. बोर्डाने अधिकृत घोषणा करताना सांगितले की, यष्टीरक्षक-फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज दोन्ही प्रकारांत उपकर्णधाराची भूमिका बजावेल.
रहमत शाह हे गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा पाठीचा कणा राहिले असून, संघातील सर्वात विश्वासू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. 31 मे 2021 पासून ते कसोटी आणि एकदिवसीय संघात उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांना पूर्णवेळ कर्णधार बनवून बोर्डाने त्यांच्या अनुभवावर आणि नेतृत्वक्षमतेवर विश्वास दाखवला आहे.
हशमतुल्लाह शाहिदी यांनी 31 मे 2021 रोजी अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने जानेवारी 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकून आपल्या प्रवासाची दमदार सुरुवात केली. शाहिदी यांच्या कर्णधारपदात अफगाणिस्तानने 55 एकदिवसीय सामन्यांपैकी 27 सामन्यांत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
शाहिदी यांच्या कार्यकाळातील सर्वात आठवणीत राहणारा क्षण म्हणजे ‘आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023’, जिथे अफगाणिस्तानने अनेक बलाढ्य संघांना धक्का दिला. संघाने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा पराभव करत गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले. या शानदार कामगिरीच्या बळावर अफगाणिस्तानने ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ साठीही पात्रता मिळवली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघानेही प्रभावी कामगिरी केली. शाहिदी यांच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला आणि स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहत आपली छाप सोडली.
आता रहमत शाह आणि रहमानुल्लाह गुरबाज यांची ही नवी नेतृत्वजोडी अफगाणिस्तानच्या आगामी आयर्लंड मालिकेपासून आपली नवी जबाबदारी सांभाळेल. रहमत शाह यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान आपला अलीकडचा यशस्वी प्रवास पुढे चालू ठेवत आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या उंचावर पोहोचू शकतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
अफगाण क्रिकेट संघाने नुकताच भारत दौरा केला होता. या दौऱ्यात अफगाणिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान एकमेव कसोटी सामना खेळला गेला, ज्यामध्ये अफगाण संघाला एक डाव आणि 300 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. आता अफगाणिस्तानचा संघ ऑगस्ट महिन्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 ऑगस्टपासून होईल. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल, ज्याची सांगता 14 ऑगस्टला होईल.
Comments are closed.