राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजपासून थरार; हिंदुस्थानचे 125 खेळाडू कौशल्य पणाला लावणार, ऍथलेटिक्सचे सर्वाधिक 32 खेळाडूंचे पथक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 जुलैपासून सुरू होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 74 देशांतील सुमारे 3 हजार खेळाडू सहभागी होणार असून, 10 क्रीडा प्रकारांतील 215 सुवर्णपदकांसाठी चुरशीची लढत रंगणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानचे 125 खेळाडू विविध खेळांमध्ये आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. हिंदुस्थानच्या या पथकात 77 पुरुष आणि 48 महिला खेळाडूंचा समावेश असून, हे सर्वजण 13 क्रीडा प्रकारांत पदकांसाठी आव्हान उभे करणार आहेत.

हिंदुस्थान राष्ट्रकुल स्पर्धेत 19व्यांदा सहभागी होत असून, 125 खेळाडूंचा ताफा पदकांसाठी मैदानात उतरणार आहे. हिंदुस्थानी खेळाडू 8 नियमित आणि 5 पॅरा क्रीडा प्रकारांत देशासाठी पदकांची कमाई करण्याचा प्रयत्न करतील. हिंदुस्थानी ताफ्यात ऍथलेटिक्समधील सर्वाधिक 32 खेळाडू आहेत. याशिवाय बॉक्सिंग आणि ज्युडोमध्ये प्रत्येकी 14, तर वेटलिफ्टिंगमध्ये 12 खेळाडूंना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, 2022च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानने 210 खेळाडू पाठवले होते आणि 61 पदकांची कमाई केली होती. मात्र, यंदा क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, स्क्वॅश, टेबल टेनिस आणि कुस्ती या लोकप्रिय खेळांचा स्पर्धेत समावेश नसल्याने हिंदुस्थानी ताफ्याचा आकार खूपच कमी झाला आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत काही प्रमुख खेळांचा समावेश नसला तरी, हिंदुस्थानचा 125 खेळाडूंचा संघ ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि पॅरा क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची संख्या वाढवण्याच्या निर्धाराने ग्लासगोमध्ये उतरणार आहे.

ऍथलेटिक्सवर सर्वाधिक भर

ऍथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा, मुरली श्रीशंकर, तेजस्विन शंकर, तजिंदरपालसिंह तूर, पारुल चौधरी, प्रियंका गोस्वामी आघाडीचे खेळाडू हिंदुस्थानच्या पदकाच्या आशा उंचावणार आहेत.

जलतरण आणि सायकलिंगमध्येही मजबूत उपस्थिती

जलतरणमध्ये श्रीहरी नटराज, साजन प्रकाश, आर्यन नेहरा हे प्रमुख चेहरे असतील, तर ट्रक सायकलिंगमध्ये रोनाल्डो सिंह लैतोंजाम आणि डेव्हिड बेकहॅम एलकटोहचुंगो यांच्याकडे लक्ष असेल.

पॅरा स्पर्धांमध्येही हिंदुस्थानचे मोठे आव्हान

पॅरा ऍथलेटिक्स, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा जलतरण आणि पॅरा ट्रक सायकलिंगमध्येही हिंदुस्थानी खेळाडू पदकांसाठी जोरदार दावेदारी करणार आहेत.

हिंदुस्थानचे प्रमुख खेळाडू

  • ॲथलेटिक्स – नीरज चोप्रा, मुरली श्रीशंकर, तेजस्वीन शंकर, पारुल चौधरी, प्रियांका गोस्वामी
  • बॉक्सिंग – लोव्हलिना बोरगोहेन, प्रीती पवार, सचिन सिवाच
  • वेटलिफ्टिंग – मीराबाई चानू, बिंदयाराणी देवी, हरजिंदर कौर
  • जलतरण – श्रीहरी नटराज, साजन प्रकाश
  • ज्युडो – तुलिका मान, हर्ष टोकस

लॉन बॉल स्पर्धेने हिंदुस्थानी मोहिमेची सुरुवात

हिंदुस्थानच्या मोहिमेची सुरुवात उद्या (दि. 23) पुरुष आणि महिला लॉन बॉल स्पर्धांमधून होणार आहे. 2022च्या बार्ंमगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱया हिंदुस्थानी लॉन बॉल संघाकडून यंदाही मोठय़ा अपेक्षा आहेत. बार्ंमगहॅममध्ये लव्हली चौबे, पिंकी सिंह, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांनी महिला फोर्स प्रकाराच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून लॉन बॉलमधील हिंदुस्थानचे पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. याचबरोबर सुनील बहादूर, चंदन सिंह, नवनीत सिंह आणि दिनेश कुमार यांच्या पुरुष फोर्स संघाने रौप्यपदक पटकावले होते. पुरुष दुहेरी प्रकारातही हिंदुस्थान पदकाच्या अगदी जवळ पोहोचला होता.

बॉक्सिंगमध्ये अनुभवी खेळाडूंची फळी

बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहेन, प्रीती पवार, जॅस्मीन लांबोरिया, साक्षी चौधरी यांच्यासह, पुरुष गटात सचिन सिवाच, जादुमणी सिंह, कपिल पोखरिया यांच्यावर हिंदुस्थानची मोठी जबाबदारी असेल.

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईकडून सुवर्णाची अपेक्षा

वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू, बिंद्याराणी देवी, हरजिंदर कौर यांच्यासह बलाढय़ हिंदुस्थानी संघ सुवर्णपदकासाठी सज्ज आहेत.

Comments are closed.