आंदोलनावरून सपा आणि काँग्रेसमध्ये संघर्ष येतो
केंद्र-काँग्रेस यांच्यात समझोत्याचा सपकडून आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या ठिय्या आंदोलनावरुन आता समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात वाद उफाळला आहे. या आंदोलनासंबंधी सत्तधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात समझोता झाला आहे काय, अशी संतप्त पृच्छा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. ही भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी काँग्रेस यांच्यातील ‘फिक्स मॅच’ आहे, अशा अर्थाचा आरोप त्यांनी बुधवारी केला आहे.
मंगळवारी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या अनेक खासदारांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आले होते. नंतर पोलिसांनी या सर्व आंदोलक नेत्यांची उचलबांगडी करुन त्यांना ताब्यात घेतले होते. रात्री उशीरा त्यांची पोलीस स्थानकांमधून सुटका करण्यात आली होती. या आंदोलनात शेवटच्या क्षणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव समाविष्ट झाले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. पण, काँग्रेसने आंदोलनापूर्वी त्यांना विश्वासात घेतले नव्हते, हे उघड झाले.
लोकसभेत शब्दयुद्ध
या आंदोलनासंबंधी बुधवारी लोकसभेत समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार अखिलेश यादव आणि काँग्रेसने खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्यात जोरदार शब्दयुद्ध झाल्याचे पहावयास मिळाले. लोकसभेत बुधवारी सकाळी नीट परीक्षेसंबंधी काहीकाळ चर्चा करण्यात आली. ओम बिर्ला यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या सदस्यांना बोलण्यासाठी काही वेळ दिला. यावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या दोन पक्षांमध्ये समझोता झाला आहे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याच दोन पक्षांना बोलण्यासाठी वेळ दिला जातो. आम्हाला का दिला जात नाही. हे आंदोलन दोन्ही पक्षांमधील समझोता दाखवून देणारे आहे, असा अर्थाचा आरोपही यादव यांनी यावेळी केला.
वेणुगोपाल यांची नाराजी
समाजवादी पक्षनेत्याच्या या टिप्पणीवर आणि आरोपावर काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी नाराजी व्यक्त केली. सदनाचे कामकाज गुरुवार पर्यंत स्थगित झाल्यावर दोन्ही नेत्यांची लोकसभागृहाबाहेर भेट झाली. त्यावेळी वेणुगोपाल यांनी स्पष्टपणे आपली नाराजी अखिलेश यादव यांना ऐकवली. राजीनामे तर नंतर घेतले जाऊ शकतात. पण विद्यार्थ्यांवर जो लाठीहल्ला झाला, त्याच्या संदर्भात आधी आवाज उठविणे आवश्यक आहे, असे प्रत्युत्तर अखिलेश यांनी दिल्याचे दिसून येते.
Comments are closed.