टेकऑफनंतर ब्रिटिश एअरवेजचे तीन वैमानिक आजारी, हैदराबाद-लंडन प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती
विमानाने टेकऑफ केल्यानंतर ब्रिटिश एअरवेजचे तीन वैमानिक आजारी पडल्याने हैदराबाद ते लंडन प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवली. एका वैमानिकाला ऑक्सिजन देण्यात आला. मात्र अन्य दोघांची प्रकृती अस्वस्थ असतानाही आपले कर्तव्य पार पाडत त्यांनी गंतव्यस्थानी विमान सुखरुप पोहचवले. लंडनमधील विमानतळावर उतरताच वैमानिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर ब्रिटिश एअरवेजने चौकशी सुरू केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ब्रिटिश एअरवेजच्या BA276 या विमानाशी संबंधित आहे. हैदराबाद येथील मुक्कामानंतर ब्रिटिश एअरवेजचे विमान हैदराबादहून लंडनला रवाना झाले. प्रवासादरम्यान विमान 30 हजार फूट उंचीवर असताना एका वैमानिकाची प्रकृती गंभीररित्या बिघडली. विमानात असतानाच त्याला ऑक्सिजन देण्यात आला. इतर दोन वैमानिकांनाही आजारपणाची लक्षणे जाणवू लागली. तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत विमान लंडनमध्ये सुखरूप पोहचवले.
ब्रिटिश एअरवेजने एक निवेदन जारी केले आहे. आमच्या सहकाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आजारपणाच्या काही तुरळक घटनांनंतर आम्ही या ठिकाणच्या कर्मचारी निवासाची समीक्षा करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. प्राथमिक अहवालांनुसार, उड्डाणापूर्वी हैदराबादमधील हॉटेलमध्ये या तिन्ही वैमानिकांनी एकत्र नाश्ता केला होता. तसेच, त्यांनी एका बाह्य कंपनीने पुरवलेले बाटलीबंद पाणीही प्यायले होते.
या घटनेनंतर, तिन्ही वैमानिकांनी एअर सेफ्टी रिपोर्ट्स (हवाई सुरक्षा अहवाल) दाखल केले आहे. आजारपणाचे कारण शोधण्यासाठी नमुने देण्यास सांगण्यात आले आहे. चौकशीचा एक भाग म्हणून एअरलाइन आता हैदराबादमधील हॉटेल व्यवस्थेची समीक्षा करत आहे. नेमके कशामुळे ‘फूड पॉयझनिंग’ झाले असावे, याचा शोध अधिकारी घेत आहेत.
Comments are closed.