मयंक यादवचे दमदार कमबॅक, दोन वर्षांनंतर संघात येताच पहिल्याच चेंडूवर रचला विक्रम
हिंदुस्थानच्या संघात दमदार पुनरागमन कसे करायचे, याचा उत्तम वस्तुपाठ वेगवान गोलंदाज मयंक यादवने दाखवून दिला. तब्बल दोन वर्षे तो संघाबाहेर होता, पण दोन वर्षांनी संघात परत येताच त्याने पहिल्याच चेंडूवर विक्रम रचला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी फक्त एकच चेंडू लागला. लखनौ सुपर जायंट्ससाठी आपल्या भेदक वेगाने आपली छाप सोडणाऱया मयंकवर या सामन्यात हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी होती.
पंचांचा नकार आणि इशानचा मास्टरस्ट्रोक
सामन्याच्या अगदी पहिल्याच चेंडूवर मयंकने एक वेगवान, उसळता आऊटस्विंगर टाकला. क्रीजवर फलंदाजी करत असलेला झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेट हा चेंडूचा वेग आणि दिशा पाहून पूर्णपणे चकित झाला. चेंडू बेनेटच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून थेट यष्टिरक्षक इशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. हिंदुस्थानी खेळाडूंनी जोरदार अपील केले, पण मैदानातील पंचांनी बेनेटला नाबाद घोषित केले. पण नाटय़ अजून संपले नव्हते. यष्टीमागे उभ्या असलेल्या इशान किशनला पूर्ण खात्री होती की, चेंडू बेनेटच्या बॅटच्या बाहेरील भागाला लागला होता. कोणताही वेळ न घालवता, इशानने लगेचच श्रेयसला पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विनवले. इशानच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवून अय्यरने डीआरएससाठी इशारा केला. जेव्हा टीव्ही रिप्लेमध्ये अल्ट्राएज पाहिले गेले, तेव्हा चेंडूला बॅटची कडा लागल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यामुळे मैदानातील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि बेनेटला शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात आले. त्यामुळे मयंकला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर पहिला बळी मिळवता आला.
विक्रमाच्या यादीत कोरले गेले मयंकचे नाव
आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी घेऊन मयंकने हिंदुस्थानी क्रिकेटच्या विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव कायमचे कोरले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा तो केवळ तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी फक्त अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांडय़ा यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Comments are closed.