हे सरकार आता कुणालाच आपलं वाटत नाही ः उद्धव ठाकरे
हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती, ज्यांनी ‘अच्छे दिन’ येतील या आशेने या सरकारला निवडून दिलं होतं. पण त्यांच्याशीच हे सरकार आज निर्दयीपणे वागत आहे. हे सरकार आता कुणालाच आपलं वाटत नाही. आता विषय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर या मुलांना आता सरकारच नकोसं झालंय, अशी तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागली.
नोटाबंदीपासूनचा राग उफाळून आलाय!
दिल्लीच्या आंदोलनातील गर्दीत एक माणूस असा भेटला ज्याला संजय राऊत यांनी विचारले की, तुम्ही कुठून आलात? तर तो म्हणाला, मी बिहारमधून आलो, पण मध्य प्रदेशचा आहे. तो विद्यार्थी नव्हे, मध्यम वयीन तरुण होता. तुम्ही का आलात, असे विचारले असता, माझा व्यवसाय नीट चालला होता, पण नोटाबंदीच्या वेळी माझा व्यवसाय, रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलो आहे, असे त्याने सांगितले. म्हणजेच सध्या जे आंदोलन सुरू आहे ते हवं तर निमित्त म्हणा, पण गेल्या काही वर्षांतील राग हा आता उफाळून वरती आला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जंतर मंतर हा आंदोलनाचा केंद्रबिंदू झाला आहे, पण ही आता पूर्ण देशाची भावना झाली आहे. म्हणूनच ‘एक राष्ट्र एक भावना’ असे मी म्हटले आहे. जो जिथे असेल तिथे त्याने त्याचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेच जण जंतर मंतरवर पोहचू शकत नाहीत. ग्रामीण भागातही आंदोलने होताहेत. अनेक राज्यांत शहराशहरात आंदोलने सुरू आहेत.
विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडताहेत. कालचा व्हिडीओ पाहिला असेल. एक तरुणी पोलिसांच्या गाडीसमोर उभी ठाकली आहे. ही तरुणाईची ताकद आहे. या तरुणांना झुरळ म्हटलं गेलं, पण याच झुरळांच्या ताकदीला आता सरकार घाबरले आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा. आता देश भीतीच्या पलीकडे गेला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
कपडे फाडून काय कळणार?
‘मारो मारो’ असे म्हणत पोलिसांच्या दंडुक्याला न घाबरणारा मुलगा आपल्या नागपूरचा आहे. तो मला भेटला. म्हणाला, मारून मारून काय करतील. असं जगून तरी काय फायदा, ही यांची जिद्द आहे. त्यामुळे आंदोलकांना मारून, त्यांचे कपडे फाडून तुम्हाला काय कळणार… त्यांच्या मनात काय चाललंय ते ओळखा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.
आणखी आग भडकवू नका
घरोघरी पोलीस जात आहेत. तपास करत आहेत, याबाबत विचारले असता, सरकारला आणि पोलिसांना माझी नम्र विनंती, तुम्ही आणखी आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत. त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचे काम करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. आंदोलनात देशविरोधी प्रवृत्ती सामील झाल्याची मुख्यमंत्र्यांना शंका आहे, असे विचारले असता, आम्हालाही शंका आहे की, सरकारमध्येही बहुतेक मुलांचे आंदोलन चिरडण्यासाठी काही परकीय शक्ती सामील झाल्यात, असा वार उद्धव ठाकरे यांनी केला.
काँग्रेसही सहभागी होणार
या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षही सहभागी होणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचनेवरून आपल्याशी संपर्प साधला होता, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आज एक ट्विट केलंय. खरं म्हणजे त्यांनी जाऊन मुलांशी बोलायला हरकत नव्हती. त्यात काही कमीपणा बाळगण्याचे कारण नव्हते. आपली मुलं आहेत. आपली जनता आहे. त्यांच्याशी बोलण्यात कमीपणा कसला? पहिल्या दिवशी जर का सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले असते तर ही वेळ आली नसती. आंदोलन इतपं ताणलं गेलं नसतं.
भाजपने पाकिस्तानातून हे गुंड आणले आहेत का?
लोकांना आज व्यक्त व्हायचं आहे. इतकी वर्षे साठलेला राग आणि असंतोष उफाळून वर आला आहे. त्याला वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रयत्न होताहेत. साध्या वेषातील काही गुंड आंदोलनात घुसत आहेत. पोलिसांच्या लाठय़ा यांच्या हातात कशा आल्या? नावाची पट्टी नाही. अंगावर वर्दी नाही. आंदोलन मोडायला भाजपने पाकिस्तानातून हे गुंड आणले आहेत का? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
जंतर मंतरवरून हलवण्याआधी मी वांगचुक यांना विनंती केली होती, ज्यांना काही संवेदना आहे, त्यांच्यासमोर उपोषण करायचं असतं. या सरकारला संवेदना नाही. त्यांना असं वाटतं की अशी लोपं गेलेली बरी. एकदाची स्मशान शांतता होऊ द्या. पण तसं काही होताना दिसत नाही.
दोषींना सोडणार नाही, असे मोदी आज म्हणताहेत; पण ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केला, ज्यांनी मुलींचे कपडे फाडले, साध्या वेषात जे गुंड तिकडे घुसवले त्या गुंडांना पकडून कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेताहेत का? हे गुंड कुणी घुसवले होते? कोणी आणले होते आणि पोलिसांच्या लाठय़ा त्यांच्या हातात कुठून आल्या? याची उत्तरे मोदी देणार आहेत का?
सरकारच्या रूपाने आलेलं हे अरिष्ट दूर होऊ दे!
शिवतीर्थ येथून ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा जाईल. तिथे जाऊन दोन गोष्टी करू. एकतर देवा या सरकारला सुबुद्धी दे म्हणू, नाहीतर साकडं घालू की, देशावरती सरकारच्या रूपाने आलेलं हे अरिष्ट लवकरात लवकर दूर कर, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती विरोधक बंदुका ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती तुम्ही बंदुका का रोखत आहात, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना केला.
कबुतरं-कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे!
दिल्लीत काही मुली भेटल्या. त्यांच्या भावना संतप्त होत्या. आमचे कपडे फाडले. वाट्टेल तसे मारण्यात आले. लाठय़ा-काठय़ांना गंजलेले खिळे लावून मारहाण करण्यात आली. डोकी फोडली. एक मुलगी तर अत्यवस्थ झाली. इतका अत्याचार सुरू आहे आणि याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे न्यायमूर्ती म्हणताहेत. न्यायालयाला कबुतरं-कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण ‘कॉक्रोच’कडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. देशाप्रमाणे न्यायालयाचीही अवस्था धृतराष्ट्रासारखी झाली आहे का? द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासाखी स्थिती आज आली आहे. मधल्या काळात चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती, ती पट्टी न्यायदेवतेने परत बांधलीय का? असा सवाल त्यांनी केला.
सरकार अशी गुंडगिरी चालवत असताना कुणीही गप्प बसू नये. प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे आणि व्यक्त होण्यासाठी, तुमच्या मनातील असंतोषाला वाट करून देण्यासाठीच आपल्याला घराबाहेर पडायचे आहे. देशाची ताकद काय असते ते दाखवून देण्यासाठी हा समोर आहे.
Comments are closed.