सीमापार दहशतवादामुळे सहकार्याची भावना नष्ट झाली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाकिस्तान-पुरस्कृत सीमापार दहशतवादामुळे दोन्ही देशांमधील सहकार्याची भावना संपुष्टात आल्याचे प्रत्युत्तर देत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर निशाणा साधला. परस्पर विश्वास आणि सदिच्छेशिवाय सिंधू पाणी कराराअंतर्गत सहकार्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले. नैसर्गिक संसाधन प्रशासनावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेतील पाकिस्तानच्या वक्तव्याला उत्तर देताना राजदूत हरीश पर्वतानेनी यांनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले. पाकिस्तानने ‘खोटा वृत्तांत’ पसरवण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या व्यासपीठाचा वापर केला. सिंधू पाणी करारावर भारताची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहे.
जेव्हा सीमापार दहशतवादाचा वापर राज्य धोरणाचे साधन म्हणून केला जातो, तेव्हा परस्पर विश्वास आणि सद्भावनेवर आधारित सहकार्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी ठणकावले. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असेही भारताने म्हटले आहे. पाकिस्तान जाणीवपूर्वक या घटनात्मक आणि कायदेशीर वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून पाकिस्तानला पुराचा इशारा देणे सुरूच राहील आणि आपल्या वाट्याच्या जलसंपत्तीचा अधिक चांगला वापर करण्यासाठी जलविद्युत प्रकल्पांना गती दिली जाईल, असे पुन्हा एकदा भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्टपणे नमूद केले आहे.
Comments are closed.