सौदीच्या राजपुत्राचा लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये मृत्यू; कॉकटेल पार्टी जीवावर बेतली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सौदीच्या राजपुत्राचा लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये मृत्यू झाला. कॉकटेल पार्टी राजपुत्राच्या जीवावर बेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अब्दुल्ला बिन फहाद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ बिन जलावी अल सौद असे मयत राजपुत्राचे नाव आहे. सफाई कामगाराने त्यांची बंद खोली उघडून आत प्रवेश केला असता ही बाब उघड झाली.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल्ला बिन फहाद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ बिन जलावी अल सौद यांनी नोव्हेंबरमध्ये एक आठवड्यासाठी लंडनमधील केंसिंग्टन येथील मॅरियट हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. घटनेच्या दिवशी रुम बंद असल्याने सफाई कर्मचाऱ्याने खोलीचे दार उघडून आत प्रवेश केला असता राजपुत्र बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता.

राजपुत्राच्या मृत्यूनंतर इनर वेस्ट लंडन कोरोनर्स कोर्टमध्ये झालेल्या चौकशीत राजपुत्र अब्दुल्ला यांचा मृत्यू मद्य, पार्टी ड्रग्ज आणि अनेक औषधांच्या सेवनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या एक दिवस आधी संध्याकाळी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर पडताना आणि त्यानंतर एकटेच हॉटेलमध्ये परतताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शेवटचे दिसले होते. हे फुटेज महत्वाचा पुरावा ठरले. यानंतर हा अपघाती मृत्यू असल्याचे घोषित केले.

चौकशीदरम्यान असे समोर आले की, टॉक्सीकोलॉजी टेस्टमध्ये राजपुत्र अब्दुल्ला यांच्या रक्तातील मद्याचे प्रमाण प्रति 100 मिलीमध्ये 222 मिग्रॅ इतके आढळले. हे प्रमाण इंग्लंडमधील वाहन चालवताना मद्यपानासाठी असलेल्या कायदेशीर मर्यादेपेक्षा जवळपास तिप्पट होते. केवळ मद्याचे इतके प्रमाणही कोमात जाण्यास कारणीभूत ठरू शकले असते, असे तज्ज्ञांनी न्यायालयात सांगितले. तसेच रक्ताच्या नमुन्यांमध्ये गामा-हायड्रॉक्सीब्युटीरेटचे संभाव्य घातक प्रमाण आढळले. यासोबतच गांजा, झॅनॅक्स (अल्प्राझोलम) आणि इतर डिप्रेशनच्या औषधांचे अंशही सापडले.

शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की राजपुत्राला कोणताही तीव्र किंवा जुनाट आजार नव्हता. वैद्यकीय पुराव्यांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला की मद्य आणि अनेक औषधांच्या मिश्रणामुळे कार्डियाक अरेस्ट आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Comments are closed.