Delhi Protest | दिल्लीतील आंदोलनाचे देशभर पडसाद ‘सीजेपी’च्या आवाहनानुसार निदर्शने : मात्र, थंडा प्रतिसाद
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
नीट पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचे पडसाद आता देशभरात उमटत आहेत.
राजधानी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज आणि झटापटींमुळे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये संताप उसळला आहे. जंतरमंतरच्या धर्तीवर देशभरातील विविध राज्यांमध्ये अनिश्चित काळासाठी निदर्शने आणि आंदोलने सुरू झाली आहेत.
दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे नेते दीपके यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी देशात ठिकठिकणी आंदोलन-निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने शांततेच्या वातावरणात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने करण्याची सूचना करण्यात आली होती.
त्यामुळे शुक्रवारी झालेली निदर्शने अतिशय शांततेच्या वातावरणात झाली. तसेच त्यांना थंडा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेशमध्ये, 69,000 शिक्षक भरतीचे उमेदवार आणि नीट उमेदवारांनी आपले संयुक्त आंदोलन तीव्र केले आहे.
शुक्रवारी लखनौमध्ये उमेदवारांनी शिक्षण राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन इको गार्डनमध्ये पाठवले. भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी उमेदवारांच्या देशव्यापी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी लखनौच्या इको गार्डनमध्ये पोहोचणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, हमीरपूरमध्ये ब्राह्मण एकता परिषद आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.
बिहारमध्ये पोलीस सतर्क
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बिहारमध्ये वाढत्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस मुख्यालयाने सर्व जिह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला असून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. नवादा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेचा संदेश देण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव धीमान यांच्या नेतृत्वाखाली संवेदनशील भागांमध्ये ध्वजसंचलन करण्यात आले. नवादा जिल्हा प्रशासन आणि सदर उपविभागीय दंडाधिकारी (एसडीओ) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अन्य राज्यांमध्येही आंदोलने तीव्र
हरियाणातील कैथलमध्ये, दिल्लीतील विद्यार्थिनींवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थी आणि शेतकरी संघटनांनी संयुक्तपणे रस्त्यावर उतरून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हाधिकारी संकुलात सुजल मेश्राम नावाच्या तरुणाने ‘इन्किलाब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. राजस्थानमध्ये, दिल्लीतील जंतरमंतरच्या धर्तीवर जयपूरमधील जवाहर सर्कल येथील पत्रिका गेटवर विद्यार्थ्यांनी अराजकीय अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आरएसएसचे निवेदन, विद्यार्थ्यांचे स्पष्टीकरण
देशभरात पसरत असलेल्या या आंदोलनांवर आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी एक निवेदन जारी केले आहे. ही आंदोलने देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील अशा शक्तींकडून प्रेरित असून त्या भारताला विकसित, सुशिक्षित आणि सक्षम होण्यापासून रोखू इच्छितात, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता प्रस्थापित होत नाही आणि जबाबदार मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्यांचा अराजकीय संघर्ष सुरूच राहील, असे विद्यार्थी आंदोलकांचे म्हणणे आहे.
Comments are closed.