आता मालिका विजयासाठी हिंदुस्थान सज्ज; वैभव सूर्यवंशीच्या झंझावातावर सर्वांचे लक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पहिल्या टी-20मध्ये झिम्बाब्वेची अक्षरशः धुलाई केल्यानंतर आता हिंदुस्थानचा तरुण ताफा दुसऱया सामन्यात मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी होणाऱया या लढतीत विजय मिळवला तर मालिका 2-0 अशी हिंदुस्थानच्या खिशात सामावेल. दुसरीकडे झिम्बाब्वेसाठी हा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई असून पराभव म्हणजे मालिका गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.

पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने प्रत्येक विभागात झिम्बाब्वेला मागे टाकले. 19 चेंडूंत तुफानी अर्धशतक झळकवणाऱया वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांचा चक्काचूर करत सामना एकतर्फी केला. ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी त्याला उत्तम साथ देत 126 धावांचे लक्ष्य तब्बल 40 चेंडू राखून पार केले. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांकडे या आक्रमणाला उत्तरच नव्हते.

त्याआधी मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटचा त्रिफळा उडवत झिम्बाब्वेच्या डावाची मान मोडली. त्याने दोन विकेट घेत सामनावीराचा किताब पटकावला. प्रिन्स यादव, रवी बिश्नोई आणि शिवम दुबे यांनीही अचूक मारा करत यजमानांना 125 धावांत रोखले.

आता सिकंदर रझाच्या संघावर जबरदस्त दबाव आहे. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी धावा केल्या नाहीत तर मालिका हातातून निसटणार हे जवळपास निश्चित आहे. गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी आणि रिचर्ड नगरावा यांनी सुरुवातीलाच हिंदुस्थानला धक्के दिले नाहीत तर सूर्यवंशीसारखे तरुण पुन्हा एकदा वादळ निर्माण करतील.

हरारेची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही साथ देणारी असली तरी आत्मविश्वासाचा पारडा स्पष्टपणे हिंदुस्थानच्या बाजूने झुकला आहे. पहिल्या सामन्यातील दणदणीत विजयाने तरुण खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आता प्रश्न एवढाच की, हिंदुस्थान आज मालिकेवर शिक्कामोर्तब करणार, की झिम्बाब्वे शेवटचा प्रतिकार करून तिसऱया सामन्याची आशा जिवंत ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.