‘डरो मत! अन्यायाविरुद्ध उभे राहण्यातच बुद्धिमत्ता आणि धैर्य, या राजवटीपासून सुटका मिळवूया’

राहुल गांधी: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील विद्यार्थी, तरुणांचे आभार मानले आहेत. राहुल गांधी यांनी या घडामोडीवर भाष्य करताना, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हे देशाच्या शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे आणि सांकेतिक पाऊल असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी देशातील संस्थांवर कब्जा मिळवू पाहणाऱ्या आणि संविधान नष्ट करू पाहणाऱ्या राजवटीविरुद्ध एकत्र लढण्याचे आवाहन केले.

मला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो

राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या तरुणांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले: “ज्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीसाठी लढा दिला, देशाच्या भविष्यासाठी संघर्ष केला आणि आपल्या संविधानाचे रक्षण केले, त्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. मला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो.” हा केवळ विद्यार्थ्यांचा विजय नसून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी शेतकरी, कामगार आणि पीडितांसाठी एक मोठा संदेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अन्यायासमोर न झुकता उभे राहणे हेच खरे धैर्य आणि बुद्धिमत्ता असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हे फक्त एक पाऊल असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सरकारला त्यांच्या उर्वरित दोन प्रमुख मागण्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले, ज्यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय केला, त्यांच्यावर मारहाण किंवा गोळीबार केला, त्या सर्वांना जबाबदार धरले पाहिजे. या हिंसाचाराचे आयोजन करणाऱ्यांपासून ते त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी भारतातील विद्यार्थ्यांचा आणि देशाच्या भविष्याचा आदर राखत, ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आणि ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.