'2027 विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारला संधी द्या,' दिग्गजाचे अनुभवी गोलंदाजाला समर्थन

भारताने 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी संघरचनेबाबत अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. भारताने नुकतेच इंग्लंड दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. ही मालिका भारताने गमावली. त्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजाला संधी दिली जावी, असे मत दिग्गजाने मांडले आहे.

भुवनेश्वरचा 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी नक्कीच विचार केला पाहिजे, असे मत आर अश्विनने व्यक्त केले आहे.

अश्विनने त्याच्या यूट्युब चॅनलवर म्हटले, “भुवनेश्वरचा 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी विचार केला पाहिजे. तो पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त दिसत आहे. त्याच्याकडे अनुभव असून, तो पॉवरप्लेमध्येही उत्तम गोलंदाजी करतो. तसेच तो खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करतो. त्यामुळे मला वाटते, त्याला आणखी एक संधी दिली पाहिजे.”

भुवनेश्वरची आयपीएल 2026 मध्ये जबरदस्त कामगिरी
भुवनेश्वरने आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली. त्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही धमाकेदार कामगिरी करत संघाच्या विजेतेपदामध्ये प्रमुख भुमिका बजावली. त्याने नव्या चेंडूने आपल्या स्विंगचे कौशल्य दाखवले आणि अखेरच्या षटकांमध्ये आपल्या अचूक यॉर्कर्सने फलंदाजांना अडचणीत आणले.

भुवनेश्वरने यंदाच्या आयपीएल हंगामातील 16 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या. तो शेवटपर्यंत पर्पल कॅपच्या शर्यतीतही होता, मात्र केवळ एका विकेटने त्याचा हा पुरस्कार हातातून निसटला.

भुवनेश्वर भारतासाठी शेवटी कधी खेळला?
भुवनेश्वरने भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यामध्ये त्याने आठ षटकांत 67 धावा दिल्या होत्या. यानंतर तो भारताच्या 50 षटकांच्या संघात दिसला नाही. तसे त्याने टी 20 संघातील स्थान टिकवून ठेवले होते, मात्र 2022 च्या टी 20 विश्वचषकानंतर त्याची आंतरराष्ट्रीय कामगिरी खालावली.

भुवनेश्वरने शेवटचा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळला. नेपियरमध्ये झालेल्या त्या सामन्यात त्याला चार षटकामध्ये एकही विकेट घेता आली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य
भारताकडून संधी न मिळाल्याने निराश न होता भुवनेश्वरने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. त्याची सध्याची कामगिरी पाहता तो फिट असून आणि त्याला अनुभवही अधिक असल्याने त्याला एकतरी संधी दिली जावी, असे अश्विनने म्हटले आहे.

Comments are closed.