यशस्वी चर्चेअंती आंदोलनावर पडदा ‘सीजेपी’च्या शिष्टमंडळाची मागण्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांशी यशस्वी तडजोड
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारसोबत सर्व प्रमुख मागण्यांवर यशस्वी बोलणी झाल्यानंतर कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता जंतरमंतर येथील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्याचे, आत्महत्या केलेल्या नीट उमेदवारांच्या कुटुंबीयांना पुरेशी नुकसान भरपाई देण्याचे आणि शिक्षण सुधारणांवरील पाच-कलमी सनदेवर चर्चा करण्याचे आश्वासन ‘सीजेपी’ला दिले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेणे, या आपल्या सर्व प्रमुख मागण्यांवर सरकारसोबत एकमत झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेले आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलक आणि आयोजकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर आणि कायदेशीर खटले मागे घेणे, तसेच नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणे या सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या होत्या.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केले, तर सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी सीजेपीचे प्रतिनिधित्व केले. बैठकीनंतर सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी कॉक्रोच जनता पार्टी सदिच्छा तत्त्वावर आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. सरकार सर्व मान्य केलेल्या अटींची निर्धारित वेळेत अंमलबजावणी करेल अशी आशाही त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ‘सीजेपी’चे आंदोलन 6 जून रोजी सुरू झाले होते.
एफआयआर मागे घेण्यावर सहमती
आंदोलक आणि आयोजकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर मागे घेण्याची मागणीही सरकारने मान्य केल्याचे सौरव दास यांनी सांगितले. हा निर्णय केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून, भाजपशासित आणि भाजप-मित्र राज्यांमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांनाही लागू होतो. एफआयआर लवकरच मागे घेतले जातील आणि त्यांच्या प्रती संघटनेला उपलब्ध करून दिल्या जातील. दिल्लीत अंदाजे 15 ते 20 एफआयआर दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रती तीन ते चार दिवसांत उपलब्ध होतील.
शैक्षणिक सुधारणांवर पुढील चर्चा
चर्चेदरम्यान, ‘सीजेपी’ने शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीमधील सुधारणांसंदर्भात सरकारला एक पंचसूत्री सनदही सादर केली. सरकार या सनदेचा अभ्यास करेल आणि सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू ठेवेल, असे पत्रकार परिषदेत नड्डा यांनी सांगितले. शिक्षण सुधारणांच्या मुद्यावर सरकार आणि सीजेपी यांच्यातील पुढील बैठक सुमारे चार आठवड्यांत होण्याची शक्यता आहे.
नुकसान भरपाईवरही एकमत
नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणीही सीजेपीने केली होती. या मागणीबाबत नियमांनुसार पीडितांच्या कुटुंबीयांना शक्य तितकी जास्तीत जास्त आणि सन्मानजनक नुकसान भरपाई देण्यास सरकारने सहमती दर्शवली असल्याचे सौरभ दास यांनी सांगितले.
सरकारने आपल्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर आणि इतर मुद्यांवर लेखी आश्वासने मिळाल्यानंतर सीजेपीने आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारकडून सर्व आश्वासने विहित मुदतीत पूर्ण केली जातील या अपेक्षेने ते आंदोलन संपवण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले आहे.
Comments are closed.