काँगोच्या जंगलात सापडली माकडाची दुर्मिळ प्रजाती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या जंगलात अभ्यासकांना एक नवीन प्रकारचं माकड सापडलं आहे. या नवीन प्रजातीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे ओठ गुलाबी-नारिंगी रंगाचे आहेत. काँगोच्या मध्य-पूर्व भागातील लोमामी नॅशनल पार्कमध्ये उंच झाडांवर लपलेले हे काळ्या केसांचं माकड यापूर्वी 2008 मध्ये पाहिल्याचे सांगितले जाते. तब्बल 10 वर्षांनी हे माकड पुन्हा दिसले तेव्हा एका आंतरराष्ट्रीय पथकानं या माकडाचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम आखली. त्यांच्या अभ्यासातूनच ही माकडांची एक नवीन प्रजाती असल्याचं समोर आलं.

गेल्या 75 वर्षांमध्ये आफ्रिकेत सापडलेली माकडांची ही पाचवी नवी प्रजाती आहे. हे माकड थोडं लाजाळू आहे. त्यामुळे ते नेहमी उंच झाडांवर लपून बसतं. झाडांच्या उंचावर राहणारी ही शाकाहारी माकडं जंगलाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.

हे माकड ‘कोलोबस’ माकडांच्या कुटुंबातीलच एक आहे. फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक केट डेटवाइलर यांच्या मते, ‘आफ्रिकेतील माकडांची ही एक खूप महत्त्वाची प्रजाती आहे. विशेष म्हणजे या माकडांना हाताचे अंगठे नसतात.’  ही माकडं खूपच दुर्मिळ आहेत. ते जंगलातील फक्त अशाच ठराविक भागात राहतात जिथे त्यांना त्यांचे आवडते अन्न आणि सुरक्षित जागा मिळते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

Comments are closed.