कॅमेराच्या रूपात घर
आपले घरकुल कसे असावे, याची प्रत्येकाची एक स्वतंत्र संकल्पना आहे. ते नेहमीच्या सामान्य घरांसारखे न राहता अनोखे असावे, असे अनेकजणांना वाटते. त्याप्रमाणे ते आपल्या घराची रचना करतात. त्यासाठी कितीही पैसा खर्च करावा लागला, तरी त्यांची ना नसते. हौसेला मोल नसते, असे यावरुनच म्हणतात. त्यामुळे आपल्याला आपल्या सभोवार अनेक आश्चर्यकारक आकारांची घरे दिसतात. अशाच एका घराची ही माहिती आहे, जी बरीच लोकप्रिय झालेली आहे.
या घराचा मालक कर्नाटकातील असून त्याचे नाव रवी होंगल असे आहे. तो स्वत: व्यवसायाने छायाचित्रकार आहे. त्याने कॅमेऱ्याच्या आकाराचे घर बांधले आहे. या घराचे नावही त्याने ‘क्लिक’ असेच ठेवले आहे. या घरातील प्रत्येक खोली, स्वयंपाकघर, बाथरुम आणि इतर सर्व बांधकाम कॅमेरा आणि त्याच्या विविध भागांसारखे आहे. या घराची बाल्कनी आणि भिंतीवरही कॅमेऱ्यांची चित्रे चितारलेली असून स्वयंपाकघराची खिडकी कॅमेऱ्याच्या लेन्ससारखी आहे. या घरातील फर्निचर आणि इतर वस्तूनांही कॅमेऱ्यांचे रंगरुप देण्यात आले आहे. या घराच्या सर्व भागांमध्ये आणि घराच्या दर्शनी, तसेच आंतर्भागात आपल्याला कॅमेऱ्याच्या थीमचे दर्शन घडते. हे घरे फिरुन पाहताना आपल्याला एखाद्या मोठ्या कॅमेऱ्यात फिरल्यासारखे वाटते, असे हे घर प्रत्यक्ष पाहिलेल्यांचे म्हणणे आहे. होंगल यांच्याकडे जुन्या-नव्या कॅमेऱ्यांचा एक मोठा संग्रह आहे. त्यांच्या या घरात आपल्याला विविध स्थानी हे कॅमेरेही कलात्मक दृष्टीने लावलेले आढळतात. कॅमेरा ही वस्तू आणि छायाचित्रण हा व्यवसाय यांच्याशी होंगल इतके जोडले गेलेले आहेत, घरात सर्वत्र विविध आकारांच्या आणि प्रकारांच्या छायाचित्रांच्या सजावटी केलेल्या दिसून येतात. अशा प्रकारचे घर भारतात पहावयास मिळणे दुर्मिळ आहे, असे या घरासंबंधी बोलले जाते. हेंगल यांना अर्थातच या घराचा रास्त अभिमान असून आपली व्यवसायासंबंधीची निष्ठा या घरातून दिसते असे त्यांचे मत आहे.
Comments are closed.