अमेरिकेच्या सिएटलमधील ‘बाइट ऑफ सिएटल खाद्य महोत्सवादरम्यान गोळीबार; दोन जण ठार तर पाच जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील सिएटलमधून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ‘बाइट ऑफ सिएटल’ हा खाद्य महोत्सव सुरू असताना एका अज्ञात बंदूकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात दोन जण जागीच ठार झाले असून, जवळपास पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

‘सिएटल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, हा गोळीबार रविवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सिएटल सेंटर आर्मरी बिल्डिंगच्या बाहेर घडला. वार्षिक ‘बाइट ऑफ सिएटल’ खाद्य महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी या भागात हजारो नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच तारांबळ उडाली आणि प्रचंड घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले.

सिएटल पोलिसांनी संपूर्ण परिसर ताबडतोब सील केला असून नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. महोत्सवाच्या ठिकाणी आर्मरीच्या बाहेर बसलेली 22 वर्षीय कायला कॅरिस हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तिला सुरुवातीला स्फोटासारखे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी मोठ्याने ओरडू लागले. गोळीबार सुरू झाल्यानंतर काही क्षणार्धातच संपूर्ण परिसरात प्रचंड धावपळ उडाली. लोक जीव वाचवण्यासाठी सिएटल सेंटर आर्मरी इमारतीच्या दिशेने धावू लागले. ही परिस्थिती अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी झाली होती, जिथे प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपले सामान तिथेच सोडून पळत सुटला होता.

Comments are closed.