पदार्थांमध्ये बेकिंग सोड्याचा अतिरेक ठरू शकतो घातक
विविध भारतीय पदार्थांमध्ये बेकिंग सोडा सर्रासपणे वापरला जातो. कचोरी, केक, भजी, वडा, ढोकळा आदी पदार्थांमध्ये बेकिंग सोडा घातला जातो. काही महिला तर दररोजच्या भाज्या लवकर शिजाव्यात यासाठी सुद्धा याचा वापर करतात. मात्र, बेकिंग सोड्याचा अतिरेक केल्यास पदार्थांची चव बदलू शकते आणि त्यातील काही जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे त्याचा वापर मर्यादेतच करणे आवश्यक असते.
कोणत्या समस्या निर्माण होतात?
- बेकिंग सोड्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका वाढू शकतो. हळूहळू हृदयविकार आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.
- सोडियमचे जास्त प्रमाण पोट फुगणे, गॅस अशा तक्रारी वाढवते. काहींना मळमळ सुद्धा होऊ शकतो.
- शरीरात जास्त प्रमाणात सोडियम गेल्यास खनिजांचे संतुलन बिघडते. परिणामी स्नायूंमध्ये गोळे येणे, अशक्तपणा जाणवतो.
- अतिप्रमाणात बेकिंग सोडा घेतल्यास रक्तातील ऍसिड आणि बेसचे संतुलन बिघडते. ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येते.
- जास्त सोडियममुळे किडनीला अतिरिक्त काम करावे लागते. त्यामुळे ज्यांना किडनीचा आधीच त्रास आहे त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.
- शरीरात द्रव साचण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे पाय सुजतात.
- लहान मुलांना सोडियम जास्त असलेले पदार्थ दिल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
दररोज नको –
कधीतरी पदार्थांमध्ये बेकिंग सोडा वापरणे योग्य असते. मात्र, रोज असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. विशेष करून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार किंवा किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी याची काळजी घ्यावी.
हेही वाचा – स्टील ,प्लास्टीक की तांबे ? मुलांसाठी कोणती वॉटर बॉटल सेफ
Comments are closed.