10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिमर नोट्स प्रकल्प नवी दिल्ली : भारतात लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक(पॉलिमर) च्या नोटा पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिमर नोटांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. ज्यानुसार 10 आणि 20 रुपयांच्या 100-100 कोटी पॉलिमर नोटा चाचणीसाठी जारी केल्या जातील. ही चाचणी यशस्वी ठरल्यास पॉलिमर नोटा मोठ्या प्रमाणात जारी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.
10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांना मंजुरी
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली. आरबीआयच्या पॉलिमर नोटांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता फक्त हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. भारतातील हवामान आणि परिस्थितीत प्लास्टिक नोटा किती टिकाऊ आणि उपयुक्त ठरतात हे पाहिलं जाणार आहे.
लोकसभेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ,सरकारने 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर बँक नोटांना मंजुरी दिली आहे. भारतीय रिझर्व बँक (RBI) ने आपल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीवरून, रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या कलम 25 अंतर्गत सरकारला 10 आणि 20 रुपये मूल्यवर्गाच्या प्रत्येकी एक अब्ज (100 कोटी) पॉलिमर बँक नोटांच्या फील्ड ट्रायलसाठी आणि ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या मूल्यवर्गांमध्ये नियमितपणे पॉलिमर नोट्स जारी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे.
आरबीआयच्या मते पॉलिमर नोटा सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकतात. काही देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु आहे, त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत, भारतात त्याचा प्रायोगिक पातळीवर वापर सुरु होईल.
प्लास्टिक नोटांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी देताना कागदाच्या नोटा बंद होणार नाहीत, असं सरकारनं स्पष्ट केलं. प्लास्टिक नोटा चलनात आल्यानंतर चलनातील सध्या कागदी नोटा देखील चलनात राहतील. प्लास्टिक नोटाची चाचणी यशस्वी झाल्यास पॉलिमर आणि कागदी नोटा दोन्ही एकाच वेळी चलनात राहतील.
आरबीआयचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला तर भारतीय मुद्रण व्यवस्थेत एक मोठा बदल पाहायला मिळेल. प्लास्टिक नोटा अधिक टिकाऊ असल्यानं लवकर खराब होणार नाहीत. यामुळं नोटा छापण्याचा खर्च दीर्घकाळासाठी कमी होऊ शकतो.
Comments are closed.