एसआयटीमध्ये ‘सीए’चा समावेश करण्याचे निर्देश राममंदिर देणगी अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात सोमवार, 27 जुलै रोजी अयोध्या श्रीराम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान राम मंदिर ट्रस्टला मिळालेल्या देणग्या आणि निधीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विशेष तपास पथकामध्ये (एसआयटी) एक चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि एक फॉरेन्सिक ऑडिटर यांचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दोन आठवड्यांच्या आत तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेले खंडपीठ देणगी अपहार प्रकरणाची सुनावणी करत आहे. या सुनावणीवेळी उत्तर प्रदेश सरकारकडून एसआयटीच्या पुनर्रचनेची माहिती देण्यात आली.
उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एसआयटीची पुनर्रचना करण्यात आल्याचे सांगितले. या तपास पथकामध्ये लखनौ रेंजचे आयजी किरण एस., अयोध्या रेंजचे डीआयजी सोमेन बर्मा आणि अयोध्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) गौरव ग्रोव्हर यांचा समावेश आहे.
यानंतर एका चार्टर्ड अकाउंटंटचाही समावेश करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर मेहता यांनी ‘होय, आम्ही करू.’ असे स्पष्ट केले. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि फॉरेन्सिक ऑडिटर हे तज्ञ आर्थिक तपास आणि ऑडिट प्रक्रियेवर देखरेख ठेवतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नाही; या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांत पुन्हा होणार आहे.
आम्ही हे प्रकरण बंद करत नाही आहोत. एसआयटी आपले काम करेल आणि आम्ही पुढील सुधारणा उपायांचाही विचार करू. सध्या आमचे लक्ष प्रामुख्याने सखोल तपासावर आहे. इतर मुद्यांवर नंतर विचार केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी मंदिराला दिलेल्या देणग्यांची माहिती वेबसाइटवर सार्वजनिक केली पाहिजे, असा युक्तिवाद केला. त्यावर तूर्तास एसआयटीने आपला अहवाल आम्हाला सादर करावा.
आजची सुनावणी संपली आहे, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सुनावणीत नवीन एसआयटी स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने 27 जुलैपर्यंत तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते.
दरम्यान, राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराची चौकशी सुरू आहे. अयोध्या पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तपास पथकाने अपहार केलेल्या निधीतून कथितरित्या खरेदी केलेली रोकड, वाहने, गुंतवणुकीची कागदपत्रे आणि इतर मालमत्ता जप्त केली आहे. इतर अनेक जणही रडारवर असून तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे.
Comments are closed.