उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; राज ठाकरे, राहुल गांधी, स्टॅलिन यांच्यासह मान्यवरांनी केले अभीष्टचिंतन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन, फोन करून तसेच समाज माध्यमातील ‘पोस्ट’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. शुभेच्छांचा ओघ दिवसभर सुरू होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, सतेज (बंटी) पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

जनता तुमच्या पाठीशी हे पुन्हा सिद्ध झाले

तुम्हाला कमकुवत करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी जनतेचा तुमच्यावरील विश्वास आणि पाठिंबा अधिकच दृढ होत गेला आहे. काल छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर लोटलेला अभूतपूर्व जनसागर त्याचीच साक्ष देणारा होता. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो तसेच सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी बळ मिळो, अशा शब्दांत तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सदिच्छा दिल्या.

‘मातोश्री’वर ओघ

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच मातोश्री निवासस्थानी ओघ सुरू होता. शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे,  आमदार अंबादास दानवे, सुनील प्रभू, चंदूमामा वैद्य, शिवसेना सचिव – आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील राऊत, नितीन देशमुख, अजय चौधरी, महेश सावंत, सुनील शिंदे, ज. मो. अभ्यंकर, अनंत (बाळा) नर, मनसे नेते बाळा नांदगावकर, उपनेत्या सुषमा अंधारे, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर,  उपनेते दिवाकर देव, गुरुनाथ खोत, विभागप्रमुख संतोष शिंदे, सुरेश पाटील, सोमनाथ सांगळे, रमेश कोरगावकर, काँग्रेस नेते नसीम खान, शिवसेना सचिव सुधीर साळवी, नगरसेवक साईनाथ दुर्गे, सचिन पडवळ, अॅड. सुहास वाडकर, अंकित प्रभू, निशिकांत शिंदे, उर्मिला पांचाळ, किरण तावडे, गितेश राऊत, राजुल पाटील, माजी महापौर महादेव देवळे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

जनतेच्या न्यायाच्या लढाईत आम्ही एकजूट ः राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. ‘महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढय़ात आम्ही एकजूट आहोत,’ असे त्यांनी नमूद केले.

Comments are closed.