माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद, सिमेंट काँक्रीटचा रस्ता उखडला; भाज्यांच्या गाड्यांना मोठा वळसा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे गावानजीक सिमेंट काँक्रीटचा रस्ता खचला आणि उखडल्यामुळे माळशेज घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या घाटातून होणारी वाहतूक लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. रस्ता खचलेल्या भागात एकेरी वाहतुकीसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. याच परिस्थितीमध्ये वाहतूक सुरू राहिली तर रस्ता आणखी खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुणे जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातून एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीच्या गाड्यांना व अन्य वाहनांना आता लोणावळामार्गे वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

महिनाभरापासून माळशेज घाट परिसरात धो धो पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटाच्या पुढे किलोमीटर ९९ / ५०० ते ९९ / ६०० दरम्यान करंजाळे गावाजवळ सुमारे १०० मीटर सिमेंट काँक्रीटचा रस्ता खचला. या भागातील सिमेंट काँक्रीटचा रस्ताही उखडला आहे. माळशेज घाटात पावसाळ्यामध्ये नेहमीच दरडी कोसळतात. त्यामुळे अनेकवेळा घाटातून एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवली जाते. मात्र करंजाळे गावाजवळ रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे. एकेरी वाहतुकीसाठीदेखील रस्ता शिल्लक राहिलेला नाही. जर वाहतूक सुरू राहिली तर रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करंजाळे येथे रस्ता पूर्णपणे खचल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश आज काढले.

जिल्हाधिकारी डूडी यांनी काढलेल्या आदेशानुसार अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील वाहनांना मुंबई आणि ठाणे शहरात जाण्यासाठी आता मळशेज घाटाचा वापर करता येणार नाही. वाहन चालकांनी मुंबईकडे जाण्यासाठी लोणावळामार्गे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी माळशेज घाट अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता रस्ता धोकादायक ठरल्यामुळे पूर्ण माळशेज घाट सर्वच वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments are closed.