बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांना बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. काँग्रेस नेत्याने या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता न्यायालय 17 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे. कर्नाटक भाजपचे कार्यकर्ते विग्नेश शिशिर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती.
याचिकाकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्यातील आरोपांची कायद्यानुसार पडताळणी केली पाहिजे. सीबीआय किंवा ईडी कायद्यानुसार योग्य कारवाई करू शकतात, असे मे महिन्यातील आपल्या आदेशात अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर 20 जुलै रोजी झालेल्या पुढील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर असमाधान व्यक्त करत ते न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशांशी विसंगत असल्याचे म्हटले. आता या खटल्याला आव्हान देण्यासोबतच राहुल गांधी यांनी हा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणारी एक स्वतंत्र हस्तांतरण याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या दोन्ही याचिका 7 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Comments are closed.