टीएमसीचे माजी आमदार निर्मल घोष यांना अटक.
आरजी कर कॉलेज बलात्कार-हत्या प्रकरणात कारवाई
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालमधील आरजी कर कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी माजी टीएमसी आमदार निर्मल घोष यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई केल्याचा आरोप आहे. खरदाह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये घोष आणि इतर दोघांची नावे आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचा मृतदेह पाणीहाटी येथील स्मशानभूमीत नेल्यानंतर रांगेतील इतर दोन मृतदेहांच्या आधी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी संमतीपत्रांवर आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्यांऐवजी शेजाऱ्यांनी सह्या केल्या होत्या, असेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
आरजी कर प्रकरणाच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांनी पोलिसांना नवीन गुन्हा दाखल करून पीडितेच्या अंत्यसंस्काराच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. पीडितेवर निर्मल घोष यांच्या उपस्थितीत पाणीहाटी येथे घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 9 ऑगस्ट 2024 च्या रात्री आरजी कर रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यभरात आणि देशभरात संतापाची लाट उसळली. घटनेनंतर लगेचच पुरावे नष्ट करण्यात आले आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे आरोप आहेत.
अंत्यसंस्कारांसंदर्भात उपस्थित झालेले प्रश्न
अंत्यसंस्कार शुल्क माफ करणे आणि कागदपत्रांवर कुटुंबीयांच्या सह्या नसणे, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या प्रकरणात निर्मल घोष यांच्यासह नगरसेवक सोमनाथ डे आणि कुटुंबीयांचे शेजारी संजीव मुखर्जी यांच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी बॅरकपूर पोलीस आयुक्तांना तपासाला गती देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तत्कालीन विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ऑगस्ट 2024 मधील एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये माजी टीएमसी आमदार निर्मल घोष हे पीडित व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्याचे निर्देश देताना दिसत आहेत.
Comments are closed.