शेवटचा वर्ल्डकप मला अविस्मरणीय बनवायचाय, स्टार हॉकी खेळाडू मनप्रीत सिंह भावुक
हिंदुस्थानच्या हॉकी संघाचा अनुभवी मिडफील्डर मनप्रीत सिंह याच्यासाठी आगामी हॉकी वर्ल्डकप केवळ एक स्पर्धा नसून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नेदरलँड आणि बेल्जियम येथे 15 ते 30 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या महासंग्रामाआधी मनप्रीतने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. हा आपले शेवटचा वर्ल्डकप असू शकतो, असे संकेत देत हिंदुस्थानला चषक जिंकवून हा क्षण अविस्मरणीय बनवण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या मनप्रीतचा हा चौथा वर्ल्डकप आहे. हा वर्ल्डकप माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकली, पण वर्ल्डकपचे पदक अजूनही आपल्याकडे नाही. दोन्ही पदके आपल्या नावावर असावीत, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. कदाचित हा माझा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो, त्यामुळे 51 वर्षांची प्रतीक्षा संपवून इतिहास रचण्याच्या उद्देशानेच मी मैदानात उतरणार आहे, असे जिओ हॉटस्टारशी बोलताना मनप्रीत म्हणाला.
51 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी
हिंदुस्थानने अखेरच्या वेळी 1975 मध्ये वर्ल्डकपचा किताब पटकावला होता. त्यानंतर गेल्या 51 वर्षांत हिंदुस्थानला या करंडकावर नाव कोरता आलेले नाही. मनप्रीतच्या मते, संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचा उत्तम ताळमेळ आहे. शिस्तबद्ध खेळ, भावनांवर नियंत्रण आणि दिलेल्या जबाबदाऱ्या चोख बजावल्यास हिंदुस्थानी संघ अंतिम फेरीत नक्कीच धडक मारेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
पाकिस्तानशी होणार सामना
हिंदुस्थानचा समावेश पूल डीमध्ये करण्यात आला असून त्यात वेल्स, इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. 15 ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्ध हिंदुस्थान आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळू की अन्य कोणत्याही संघाविरुद्ध, आम्ही केवळ आमच्या गेम प्लॅनवर लक्ष केंद्रित करतो. प्रतिस्पर्ध्याचे नाव किंवा त्याच्या प्रतिष्ठेने आम्हाला फरक पडत नाही, असे मनप्रीतने स्पष्ट केले.
फिटनेस आणि बचावात्मक खेळावर विशेष भर
या स्पर्धेत मनप्रीत सिंह, कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि मनदीप सिंह हे वरिष्ठ खेळाडू युवा सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. मुख्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संघाने तंदुरुस्ती आणि बचाव फळी मजबूत करण्यावर विशेष मेहनत घेतली आहे. मजबूत बचाव फळीमुळेच आक्रमक खेळ खेळण्याचा आत्मविश्वास मिळतो, असे मनप्रीतने अधोरेखित केले.
Comments are closed.