आंबा घाटात रस्त्याला भेगा आणि प्रवाशांच्या खिशाला कात्री, अणुस्कुरामार्गे वाहतूक वळविल्याने तिकिटात 90 रूपयांची वाढ
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. 100 मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने आंबा घाटातून अवजड वाहने आणि एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अणुस्कुरामार्गे एसटी वाहतूक वळविण्यात आली असली तरी त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसला आहे. 42 किमी अंतर वाढल्याने तिकिटात 90 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याला भेगा आणि प्रवाशांनी त्रास भोगा अशी अवस्था झाली आहे.
12 ऑगस्टपासून आंबा घाटातून जाणारी एसटी, प्रवासी बसेस आणि सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आंबा घाटातील कि.मी. 69.500 ते कि.मी. 69.600 दरम्यान डाव्या बाजूला रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूंना सुमारे 100 मीटर खोल दरी आहे. त्यामुळे रस्ता खचून जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी तातडीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
रत्नागिरी ते कोल्हापूर व कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहनांसाठी प्रशासनाने खालील पर्यायी मार्ग सुचवले आहेत. रत्नागिरी – हातखंबा – पाली – अणुस्कुरा घाट – राजापूर – कोल्हापूर तसेच फोंडाघाट आणि भुईबावडा घाटाचा मार्ग सुचवण्यात आला आहे. एसटी बस अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली असली तरी त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसला आहे. तिकिटदरात 90 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अणुस्कुरा घाट अवघड असल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या शिवशाही गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. आंबा घाटातील वाहतूक बंद होताच ऑनलाइन आरक्षणातील गाड्या गायब झाल्या आहेत. आंबा घाट बंद झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे.
Comments are closed.