शहापुरातील १२७ गावे ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये, केंद्र सरकारची नोटीस; ६० दिवसांत हरकती नोंदवण्याच्या सूचना:
>> नरेश जाधव
शहापूर तालुक्यातील १२७ गावांचा लवकरच ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये समावेश करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने स्थानिकांना नोटिसा बजावल्या असून ६० दिवसांच्या आत हरकती नोंदवण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे १२७ गावांमधील रहिवाशी संतप्त झाले असून लोकहित फाउंडेशननेदेखील विरोध दर्शवत संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर इको सेन्सिटिव्ह झोनचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २७ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी सभा घेण्यात आली. यावेळी लोकहित फाउंडेशनचे पदाधिकारी निखिल खाडे, विठ्ठल भोईर, प्रमोद निचिते, रामकृष्ण निचिते, रवींद्र घावट, जितेंद्र घावट, दिनेश वेखंडे आदी उपस्थित होते. इको सेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात संघर्ष करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तर १२७ गावांनीदेखील ग्रामसभेत ठराव मंजूर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
* केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या ७ मे २०२४ च्या अधिसूचनेनुसार तानसा अभयारण्यालगत इको सेन्सिटिव्ह झोन लागू होणार आहे.
* इको सेन्सिटिव्ह झोन अस्तित्वात आल्यास शेतकरी, व्यावसायिक, कारखानदार व कामगार देशोधडीला लागणार आहेत. अधिसूचनेनुसार अनेक जाचक अटी व निर्बंध अमलात आणले जाणार आहेत.
* कधीही भरून येणार नाही अशी आर्थिक हानी होणार असल्याने सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात शहापूर तालुक्यातील बाधित शेतकरी एकवटले आहेत.
“शहापूर विकसित तालुका असून त्यात पश्चिम घाट संलग्नता नाही तसेच सध्या तिसरी मुंबई म्हणून शहापूर तालुक्याकडे पाहिले जाते. येथील दळणवळणाच्या सर्व सोयी उपलब्ध असल्याने येथील नागरीकरण वाढत आहे त्यामुळे तालुक्यातील गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावीत.”
ॲड. निखिल खाडे, लोकहित फाउंडेशन, शहापूर
Comments are closed.