2047 ची स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या खाली उभं राहून खोटं बोलत आहेत, संजय राऊत यांचा घणाघात
आज देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण करताना 2047 साली देश विकसित होईल अशी घोषणा केली. त्यावर 2047 ची स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या खाली उभं राहून खोटं बोलत आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच जेव्हा देशाचा गृहमंत्री पळपुटा असतो तेव्हा पुलवामा आणि पहलगामसारखे दहशतवादी हल्ले होतात, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आज देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन आहे. हा दिवस यावा म्हणून देशातल्या हजारो-लाखो युवा शक्तींनी महात्मा गांधी, पंडित नेहरु, मौलाना आझाद अशा असंख्य सेनापतींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरोधात संघर्ष केला, तुरुंगवास भोगला, बलिदान दिलं. तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. आणि नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर भाषण करण्याची संधी मिळाली. यासाठी देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी मोदींसह गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझाद, विनोबा भावे, अच्युतराव पटवर्धन अशा असंख्य क्रांतिकारक, स्वातंत्र्याचे सेनानी होते त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवायला हवा. सध्याचे पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचे लोक किती कृतज्ञता भाव ठेवतात याबाबत मी साशंक आहे. मोदींचे भाषण मी ऐकले नाही. पण त्यांनी युवाशक्तीबाबात मत व्यक्त केल्याचे मला पत्रकारांनी सांगितले. या देशाची जडणघडण आणि या देशात मोकळा श्वास घेण्याची संधी ही प्रत्येकवेळी युवा शक्तीने दिलेली आहे. भगत सिंहासारखे तरुण फासावर गेले. आणि आता जंतरमंतरवर आंदोलन झाले, ते देशाच्या स्वातंत्र्याभोवती जो गळफास बसलेला आहे तो दूर करण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी झाले होते. त्यामुळे युवाशक्तीने या सरकारला गदागदा हलवलं आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी युवा शक्तीचे आभार मानले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला. त्यामुळे ज्यांचे वय 75 आहे त्यांनी युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील, असे संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी किमान स्वातंत्र्यदिनी खोटं बोलू नये. हजारो क्रांतिकारांनी बलिदान दिल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यांचं स्मरण करण्याचं सोडून पंतप्रधान मोदी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर ते आमच्या स्वातंत्र्यदिनाचं दुर्दैव आहे. मोदी आज ज्यांना विरोधक मानत आहेत, काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष हे तीन पक्ष देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नसते, तर मोदी या देशाचे पंतप्रधान म्हणून कधीच भाषण करू शकले नसते. कारण या देशात स्वातंत्र्य चळवळीत भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधीही सहभाग नव्हता, किंबहुना त्यांनी चलेजाव चळवळीला विरोध केला, असं इतिहास पुराव्यासहित सांगतो. त्यामुळे मोदींचा रोख काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्यलढ्याशी बेईमानी करत आहेत, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असतील, पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसचे योगदान हे कुणालाही हिरावून घेता येणार नाही. आणि देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांनी त्या स्वातंत्र्य लढ्यावरील तळपत्या सूर्याला कितीही थुंकण्याचा प्रयत्न केला तरी हा स्वातंत्र्याचा सूर्य आकाशातून गर्जना करत राहिल. हो, या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे 100 टक्के होते. आणि भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यात उपस्थित नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
2023 साली महिला आरक्षणासंदर्भातील विधेयक संसदेत एकमताने मंजूर झालेले आहे. देशाच्या पंतप्रधानांना माझे एक आवाहन आहे, 2023 साली मंजूर झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तर लाल किल्ल्यावरील भाषणातून दिले असते तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं.
देवेंद्र फडणवीस जनतेचे न्यायालय कुणाला म्हणत आहेत? ज्या जनतेच्या न्यायालयात फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयांना मतं विकत घेतली आहेत. आणि अत्यंत बोगस लोकांनाही त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनेचा लाभ लाखो पुरुषांनाही दिला. लाखो अपात्र लोकांना ऐन निवडणुकीत तुम्ही लाभ दिला आणि आपण एक विजय प्राप्त केला, ते भ्रष्ट जन न्यायालय आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवर संकट आणत आहात. ईव्हीएमचा घोटाळा करून तुम्ही हे जनता न्यायालय उभे केलेले आहे. प्रचंड भ्रष्टाचार करून त्याचे पैसे मतदारांना देऊन तुम्ही या जनता न्यायालयाची निर्मिती केलेली आहे. आणि हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल ही काय धमकी आहे का? एका बाजूला नरेंद्र मोदी गद्दारांच्या बाजूने आहोत असं सांगतात. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की सर्वोच्च न्यायालयातही आमच्याच बाजूने निकाल लागेल, तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्या आहेत का? जनतेला कळू द्या, आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. या देशाला संविधान आणि लोकशाही आहे. या देशातील निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संवैधानिक संस्था नेहरुंच्या काळापासून निष्पक्षपणे काम करत होत्या. तुम्ही त्यांना भ्रष्ट करण्याचा आणि दबावाखाली निर्णय देण्याचा प्रयत्न करत असाल तर या देशातली जनता ते सहन करणार नाहीत. लोक आता जागे झाले आहेत. आता शाळेतली मुलंही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली आहेत. देवेंद्र फडणवीस कृपया तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका. बाकी इतर फुटलेल्या टोळ्या आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू. फडणवीसांना यात पडू नये, हे त्यांचे काम नाही. न्यायालयाला त्यांचे काम करू द्या. सर्वोच्च न्यायालयात हाच निकाल लागेल अशी धमकी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, ती आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ.
अलीकडच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यदिनाला खासगी स्वरूप आलेले आहे. मग तो सोहळा लाल किल्ल्यावरचा असो किंवा राज्यातला असो. 2014 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं असं भाजपला वाटलं. मग त्यांनी त्या दिवशी स्वातंत्र्य सोहळा साजरा केला पाहिजे. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात एक टक्काही सहभाग नाही, किंवा ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला विरोध केला, आणि ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली ते लोक आता लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी भाषण करत आहेत. हे या जगातील आठवे आश्चर्य आहे. जगात असं कधीही घडलं नव्हतं.
पृथ्वीराज चव्हाण काही चुकीचे बोलले नाहीत. माणसाला महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही. पण महत्त्वाकांक्षेसोबत लायकीही असायला पाहिजे. लायकी नसेल आणि महत्त्वाकांक्षा असून पदावर असेल तर ती व्यक्ती देशाच्या लोकशाही आणि स्वातंत्र्याचे नुकसान करत आहे. त्याच पद्धतीने अमित शहा देशाचे नुकसान करत आहेत. त्यांनी मोदींकडे अशी मागणी केली की, मला उपपंतप्रधान करा. आणि मोदींनी ती मागणी सध्या फेटाळलेली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना सभागृहात येण्यापासून कुणीही अडवलं नव्हतं. विरोधक येऊ देत नव्हते असे म्हणत होते, मग त्यांनी राजीनामा द्यायला हवा. विरोधक अमित शहांकडे काही प्रश्नांची उत्तरं मागत आहेत. जे प्रश्न देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहेत, तरुणांवर झालेल्या गोळीबारासंदर्भात आहेत, तुम्ही कशाकरता पळून जाता. देशाचा गृहमंत्री जर पळपुटा असेल तर पुलवामा आणि पहलगामसारखे दहशतवादी हल्ले होतात, आम्हाला भीती वाटते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
देशभरातल्या शाळांच्या स्थितीवर जर या तरुणांच्या संघटनेने काही काम सुरू केलं असेल तर ते अत्यंत योग्य आहे. कारण ज्यांच्या हातात शिक्षणव्यवस्था आहे, जे सरकार आहे, त्या सरकारमधील लोकांची मुलं परदेशात शिकत आहेत. त्यांना इकडल्या शाळांची काहीही देणंघेणं नाही. सर्व केंद्रीय मंत्र्यांची मुलं परदेशात शिकत आहेत.
मोदी जेव्हा 2014 साली सत्तेत आले होते तेव्हा पाच वर्षांत अच्छे दिन येतील असे वचन दिले होते. पुन्हा निवडून आले तेव्हा पुन्हा पाच वर्षांत विकास करू असे वचन दिले होते. एक कोटी लोकांना नोकरी देणार होते, एक लाख लोकांना तरी गेल्या 12 वर्षांत नोकऱ्या मिळाल्या का? 2046 कुणी पाहिलंय. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा 2029 सुद्धा पाहणार नाहीत. आता तुम्ही 2046 ची स्वप्नं दाखवत आहात. आणि लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या खाली उभे राहून खोटं बोलताय. त्यांना कधी तिरंग्याबद्दल ना सन्मान होता, ना प्रेम.
या सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला, विद्यार्थ्यांवर गोळीबार केला आता लखनौवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत मग त्यांच्यावरही गोळीबार करतील हे लोक. हे देशाचे स्वातंत्र्य नाही. देशाचे संविधान याला मान्यता देत नाही. तरीही हे लोक संविधानाच्या चिंधड्या-चिंधड्या करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
Comments are closed.