बोलीभाषेची समृद्धी – मालवणी बोलीचा गोडवा

>> वर्णिका काकडे

मालवणी ही महाराष्ट्राच्या कोकण भागात, प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात बोलली जाणारी एक गोड व प्रसिद्ध मराठी बोलीभाषा आहे. ही कुडाळी किंवा कुडाळदेशकर भाषा म्हणूनही ओळखली जाते.

ही कोकणीची एक बोलीभाषा असून त्यात मराठीतून घेतलेले शब्द आहेत. या बोलीभाषेला स्वतंत्र अशी लिपी नाही परंतु बहुतेक भाषक देवनागरी लिपी वापरतात. मालवणीचा वापर कधीकधी उपहासात्मक लेखनासाठी आणि दशावतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक लोकनाटय़ांसाठी केला जातो.

अनुनासिक उच्चार हे मालवणी बोलीचे मुख्य वैशिष्ट्य. हेल काढून बोलण्यात या भाषेचा लहेजा दिसून येतो. गावरहाटीतील देवतांना घातलेली गाऱहाणी, लोकगीते, वाक्प्रचार, म्हणी यातून या बोलीचे सौंदर्य आणि शब्दांची विपुलता दिसून येते. लोकगीते व लोकनाटय़ांतून बोलीच्या माध्यमातून या समजाचे दर्शन घडवण्याचे काम ही बोली करते. विशेषत कृषक संस्कृतीचे दर्शन मालवणी लोकगीतांमधून प्रकट होते. ही बोली समाजाप्रमाणे आणि जातीसमूहाप्रमाणे विभिन्न रूपात दैनंदिन जीवनात वापरली जाते. कोकणातील मुस्लिम समाजात तर हिंदी आणि मालवणीचे मिश्ररूप पाहायला मिळते.

या बोलीतील व्याकरणीय बारकावे प्रमाण मराठीपेक्षा वेगळे आहेत.  सर्वनामांमध्ये ‘ला’ चा ‘का’ असा बदल होतो. मराठीतील ‘होय’, ‘हे’, ‘ते’, ‘कुठे’, ‘येथे’, ‘तिथे’ या शब्दांचे मालवणीत वेगवेगळे प्रतिशब्द आहेत. मालवणी बोलीतील काही शब्द प्रमाण बोलीतही रुढ झाले आहेत. उदाहरणार्थ रापण, तिकाटणे, पांगुळ, कांडप, ओवरी, साकव, पांदण, राखण.

मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे, झिल-चेडू (मुलगा-मुलगी), घोव (नवरा), आवाठ (वाडी), देवचार (गावसीमेवरील देवता), असकाट (झाडी), कळयारो (भांडण लावणारा), निशान (शिडी), वांगड (सोबत), कुणगो (शेती). हे शब्द मालवणी ललित साहित्य, नाटय़ यात वापरले जातात. कोणतीही बोली मूळ प्रमाणभाषेलाही समृद्ध करते. ही बोली याचेच एक उदाहरण आहे. मालवणच्या प्रदेशात फिरताना ही बोली कानावर पडते आणि त्यातील गोडव्यामुळे प्रमाणभाषेपेक्षा अधिक जिवंत व रसरशीत अनुभव मिळतो.

Comments are closed.