तीन UGC-NET विषयांसाठी पुनर्परीक्षा
एनटीए’ची माहिती : पुनर्परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारणार नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ‘यूजीसी-नेट जून 2026’ परीक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. एजन्सीने इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तिन्ही विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा केंद्र, परीक्षा शहर आणि प्रवेशपत्रासंबंधी तपशील नंतर जाहीर केला जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. यासंबंधी उमेदवारांना एनटीएच्या अधिकृत सूचनेची प्रतीक्षा करावी लागेल.
एनटीएच्या माहितीनुसार, यूजीसी-नेट जून 2026 परीक्षा 22 ते 30 जून दरम्यान 87 विषयांसाठी घेण्यात आली होती. परीक्षेनंतर, इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांबद्दल मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर एनटीएने या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. समितीच्या चौकशीत प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, टंकलेखन आणि भाषांतराच्या चुका आढळून आल्या. त्यानंतर या तीन विषयांची फेरपरीक्षा करण्याची शिफारस केल्यानंतर एनटीएने हा प्रस्ताव स्वीकारला आहे.
तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये नामांकित तज्ञांच्या नावांची चुकीची स्पेलिंग, पुस्तकांच्या शीर्षकांमधील चुका आणि प्रश्नांच्या भाषेतील समस्या यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, व्याकरणातील चुका, लिंग आणि वचनातील विसंगती, विरामचिन्हांच्या चुका आणि प्रस्थापित संकल्पनांसाठी अयोग्य शब्दांचा वापर यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच मागील परीक्षांमध्ये विचारलेले काही प्रश्न 2026 च्या प्रश्नपत्रिकेत पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याचेही आढळून आले.
Comments are closed.