इमरान हाश्मीचा जोरदार कमबॅक; ‘आवारपन 2’ ने ‘धमाल 4’ला मागे टाकत केली इतक्या कोटींची कमाई
इम्रान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘आवारपन 2’ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत विकेंडमध्ये जबरदस्त कमाई केली आहे. 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक ॲक्शन सिक्वेलने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी, 26.50 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सुरुवातीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे चित्रपटाची तीन दिवसांतील एकूण कमाई 82 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार ‘आवारपन 2’ने पहिल्याच दिवशी 22 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याने 33.75 कोटींचा गल्ला जमवला. रविवारी दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत कमाईत काहीशी घट झाली असली, तरी 26.50 कोटी रुपयांच्या कमाईमुळे चित्रपटाने विकेंडमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवली.
या दमदार कमाईसह ‘आवारपन 2’ने अजय देवगणच्या ‘धमाल 4’लाही मागे टाकले आहे. ‘धमाल 4’ने ओपनिंग विकेंडमध्ये 67.21 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच्या तुलनेत ‘आवारपन 2’ने 82 कोटी रुपयांची कमाई करत 2026 मधील तिसरा सर्वात मोठा ओपनिंग विकेंड नोंदवला आहे.
2026 मधील सर्वाधिक ओपनिंग विकेंडच्या यादीत ‘धुरंधर 2’ 466 कोटीसह आघाडीवर आहे. त्यानंतर ‘बॉर्डर 2’ने 129.89 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘आवारपन 2’ 82 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘धमाल 4’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ यांचा क्रमांक लागतो.
विशेष म्हणजे, 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आवारपन ’ हा चित्रपट प्रदर्शित होताना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नव्हता. मात्र, कालांतराने त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. आता तब्बल 19 वर्षांनंतर आलेल्या ‘आवारपन 2’ला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.
Comments are closed.