Pune News – भोरमध्ये बापाच्या डोळ्यांदेखत मुलाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू; आमदार म्हणतात रोड आहे तर अपघात होणार…
भोरमध्ये खड्ड्यामुळे बापासमोर 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खड्यामध्ये दुचाकी आदळली आणि मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली मुलगा पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. यासंदर्भात अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांना पत्रकारांनी सवाल केला. त्यावर आमदार मांडेकर यांनी अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिले. रस्ते आहेत तर अपघात होणार, असे शंकर मांडेकर म्हणाले.
रोड आहे अपघात घडतो, पण असं घडू नये. पण बऱ्याच वेळा एखादा अपघात घडला तर ज्याची मोठी गाडी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, असं बेजबाबदार आणि असंवेदनशील उत्तर शंकर मांडेकर यांनी माध्यमांना दिले. तसेच पत्रकारांनी प्रतिप्रश्न केला असताना त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती लावताच आमदारांची बोबडी वळली. हे प्रशासनाचं अपयश वाटत नाही का? असा सवाल त्यांना करण्यात आला. आमदार म्हणाले, हो अपयश वाटतंय. पण तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. मी गेले दोन वर्षे झाले अधिवेशनात बोलतोय. पण शेवटी सरकार आहे. मी तरी काय करणार? असं म्हणत आमदार शंकर मांडेकर जबाबदारी झटकून मोकळे झाले.
Comments are closed.